मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडसह ऑक्सीजन जनरेटर प्लांट व सिटीस्कॅन बसविनार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. कोरोना आढावा बैठकीसह कोविड केंद्राला १० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप

मुरगूड प्रतिनिधी :
सध्या २५ बेड असलेल्या मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडस ऑक्सिजन जनरेटर प्लांट व सिटीस्कॅन यासह अन्य अनुषंगिक सुविधा ठरविणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुरगुडमध्ये कोरोना परिस्थितीची आढावा बैठक व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोविड केअर केंद्राला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, अनपेक्षितपणे आलेल्या या जागतिक महामारीशी गेल्या सव्वा वर्षापासून आपण लढत आहोत. पहिली लाट संपल्यानंतर पुन्हा हा रोग येणार नाही, असं वाटलं होतं. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम, समारंभ, निवडणुका यामध्ये खबरदारी घेतली नाही व त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या लाटेत रूपांतर होण्यामध्ये झाले. अहोरात्र लढणाऱ्या सरकारी डॉक्टर्स व आरोग्य यंत्रणेचेही मंत्री मुश्रीफ यांनी कौतुक केले.
ते पुढे म्हणाले, आरोग्य व्यवस्था भक्कम केली नाही तर पुढच्या लाटेला फार गंभीर परी तोंड द्यावे लागेल. तज्ञांच्या अभ्यासानुसार तिसऱ्या फेरीत लहान मुलांना फार धोका आहे. आपण आताही त्याच चुका पुन्हा केल्या तर समाज आपल्याला माफ करणार नाही. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला कायम आहेच.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, रणजीत सुर्यवंशी, राजू आमते, ॲड. सुधीर सावर्डेकर आदी प्रमुख उपस्थित होते.आभार नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मानले.
मुख्यमंत्र्यांचे काम प्रभावी..
श्री. मुश्रीफ म्हणाले, कोणीही कितीही टीका आरोप करोत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोणा महामारीत अतिशय प्रभावीपणे काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व नीती आयोगानेही राज्याचे कौतुक केले आहे. इंडिया टुडेचे प्रमुख संपादक प्रभू चावला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व केरळचे मुख्यमंत्री विजय पेरियन यांच्याबद्दल देशाचे मत जाणून घेतले आहे. या सर्वेत ६५ टक्क्याहून अधिक लोकांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे.
आम्ही नेमकं काय करत आहोत?
भारतापेक्षा बांगलादेशाचे दरडोई उत्पन्न २८० कोटी डॉलर्स वाढले असल्याकडे लक्ष वेधताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ही बातमी वाचून मी तर हडबडून गेलो, तिथेही कोरोना आहेच. १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी या देशाला भारतापासून स्वतंत्र करून वेगळा देश केला होता. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या देशापेक्षा दरडोई उत्पन्नामध्ये आपण दुपटीहून अधिक होतो. आपण नेमके काय करत आहोत, हेच आम्हाला समजेना झालंय, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
आरबीआय कडून एक लाख कोटी
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, भारतीय रिझर्व बँकेने कालच केंद्र सरकारला एक लाख कोटी रुपये दिले आहेत. या पैशात संपूर्ण देशाचे मोफत लसीकरण व्हायला काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी केला. निदान महाराष्ट्राच्या जीएसटीच्या परताव्याची रक्कम तरी केंद्र सरकारने आम्हाला परत द्यावी.