2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून तक्रारदाराच्या आई-वडिलांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी व अदखलपात्र गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबड पोलिस ठाण्याच्या हेडकॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.26) दुपारी अंबड रोडवरील पृथ्वीराज बार अँड रेस्टॉरंट येथे केली. महादू अप्पाराव पवार (वय-56 रा. नाव्हा ता.जि. जालना) असे ताब्यात घेतलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.
याबाबत 27 वर्षीय व्यक्तीने जालना एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदाराविरुद्ध अंबड तालुक्यातील कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून 20 जुलै 2023 रोजी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (FIR) दाखल झालेला आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या आई-वडील यांच्यावर महादू पवार यांनी प्रतिबंधक कार्यवाई केलेली होती. तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी महादू पवार यांनी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची तक्रार जालना एसीबीकडे केली. यावरून बुधवारी एसीबीने जालना शहरातील अंबडवरील पृथ्वीराज बार अँड रेस्टॉरंट मध्ये सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून महादू पवार यांनी पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी जालना तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे , अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे ,पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर ,पोलीस अंमलदार गजानन कांबळे, जावेद शेख, शिवाज जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे,ज्ञानदेव झुंबड, आत्माराम डोईफोडे, गजानन खरात, संदीप लहाने, विठ्ठल कापसे, प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.