ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या इथेनॉल हंगामाची सांगता; लवकरच दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मितीची विस्तारवाढ : संचालक साजिद मुश्रीफ यांची माहिती.

       
सेनापती कापशी :

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची उत्पादन क्षमता लवकरच दररोज एक लाख लिटर इतकी करणार असल्याची माहिती संचालक साजिद मुश्रीफ यांनी दिली. इथेनॉल प्रकल्पाच्या हंगाम समाप्तीनिमित्त प्रकल्पस्थळावर श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पूजा बांधण्यात आली होती. यावेळी प्रकल्पातून उत्पादित इथेनॉलचे पूजनही त्यांच्या हस्ते झाले.

भाषणात श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, यावर्षी इथेनॉल प्रकल्पाचा हंगाम दहा ऑक्टोबर २०२० रोजी सुरु झाला व दोन ऑगस्ट २०२१ रोजी हंगामाची सांगता झाली. या हंगामामध्ये एकूण एक कोटी, २० हजार लिटर्स इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे. तसेच; मागणीचा विचार करून हंगामामध्ये  २८ लाख, ३८ हजार लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिटचे उत्पादन व विक्रीही केली आहे. इथेनॉल व रेक्टिफाईड स्पिरिट असे एकूण एक कोटी, २८ लाख, ५८ हजार लिटरचे उत्पादन या हंगामामध्ये झाले आहे. दरम्यान, आत्तापासून सात सप्टेंबरपर्यंत डिस्टीलरी बंद राहणार असून  मेंटेनन्सची कामे केली जाणार आहेत.
        
डिस्टिलरीचा २७६ दिवस हंगाम यशस्वीरित्या चालवल्याबद्दल डिस्टिलरीचे इन्चार्ज संतोष मोरबाळे, सिनियर केमिस्ट रणजीत कदम, सीनियर केमिस्ट प्रदीप माळकर यांच्यासह विभागातील सहकारी अधिकारी व कामगारांचा सत्कार यावेळी झाला.
       
संचालक श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आमचे नेते, कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफसाहेब यांनी आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कारखान्याची गाळप क्षमता दररोज दहा हजार मेट्रिक टन, ५० मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प व दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती याप्रमाणे विस्तारवाढ करण्याचा मनोदय याआधीच व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे व्यवस्थापन आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न करीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी,  तोडणी -वाहतुकीची बिले, सभासद साखर वेळेवर देण्याची परंपरा ठेवली असून शेतकऱ्यांच्यासाठी अनेक सवलतीच्या योजनाही कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना जादा ऊस उत्पादनाबाबत सातत्याने मार्गदर्शनही केले जात आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्वच्या -सर्व उस कारखान्याला गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच येत्या गळीत हंगामासाठी जय्यत तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. कारखाना एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असलेबाबत श्री. मुश्रीफ यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

स्वागत डिस्टिलरी इन्चार्ज संतोष मोरबाळे यांनी केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले.

यावेळी सेहान मुश्रीफ यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.           

 

“ऑक्सीजन प्रकल्पाचे जयंत पाटलांच्या हस्ते उद्घाटन…..”

यावेळी बोलताना श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यासह देशातील ऑक्सीजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते शरद पवारसाहेब यांनी साखर कारखान्यांनी ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कारखान्याचा ऑक्सिजन प्रकल्पही उभारला आहे. आंबेओहळ प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील येताहेत. मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कारखान्याच्या या ऑक्सिजन प्रकल्पाचेही उद्घाटन लवकरच होणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks