कुस्तीगीर व लोककलावंत : मारुती गणपती वारके

शब्दांकन : आनंद वारके
(म.कासारवाडा)
कासारवाड्यातील वस्ताद पै.मारुती गणपती वारके आपल्यातून गेले.गावातील एक लोक कलावंत गेला.
ते हाडाचे कलावंत होते.उत्कृष्ट ढोलकी वादक होते.उत्कृष्ट हलगी वादक होते.अनेकांचे गुरु वस्ताद होते.पैलवान होते.शाहीर होते.
आपल्याकडील कला त्यांनी बर्याच जणांना शिकविल्या.त्यांच्या प्रोत्साहनातून नंतरच्या पिढीत पै.अप्पासो जमादार,पै.सर्जेराव बुजरे,पै.कृष्णात पार्टे ही पैलवानांची पिढी तयार झाली.
ते स्वत:ही एक उत्कृष्ट पैलवान होते.त्या काळात साताप्पा वारके (टेलर),देवाप्पा वारके,दामोदर पावले,साताप्पा दादू ताैंदकर,बापूसो सखाराम वारके,महिपती महादेव जितकर,गणपती धुळाप्पा फराकटे अशी कांही मोजकी मंडळी गावच्या तालमीत सराव करायची.त्यात पै.मारुती वारके अस्सल.ते गावोगावातील कुस्ती मैदानात सहभागी व्हायचेत.त्या काळात त्यांनी अनेक कुस्त्या मारल्या.
ते बिद्री साखर कारखान्यात कायम सिझनल कामगार होते.ते कारखान्या क्रेन आॅपरेटर म्हणून काम करीत होते.तेथेही त्यांनी निष्ठेने सेवा केली.
ते दिवसभर कोठेही अदले तरी सांज झाली की त्यांची पावले तालमीकडे वळत.प्रथमतः हनुमानाच्या मूर्तीला उदबत्ती लावून ते तालमीचे मैदान नवीन तालमीत खेळणार्या मुलांसाठी खुले करीत असत.हनुमानाची उपासना ही शक्तीची उपासना या विचारावर त्यांची निष्ठा होती.
तालमीतील लाल माती खराब झाली तर त्यांना चैन पडत नसे.तालमीत येणार्या मुलांना घेऊन मांगेवाडी परिसरातून आणून तालमीत टाकल्यावरच त्यांना बरं वाटायचं.
लेझीम खेळताना हलगी फुटली तर हलगीचं कडं घेऊन आकनूर,बोरवडे,सरवडे या गावी सायकलने प्रवास करुन ते हलगी मढवून आणित असत.त्यासाठी वर्गणीतून पैसे जमा होत असत.
गावातील तालमीच्या डागडुजीसाठी प्रसंगी सुगीत घराघरातून भात गोळा करायचे.ते दुकानात विकायचे.पैसे करायचे आणि तालमीत एखादे साधन आणायचे.अशी त्यांची धडपड होती.कासारवाडा ते नदी पुलापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढणारे गवत कापायला बंदी केली जायची.त्याची रखवाली तालमीकडे असायची.श्रावण महिन्यात वाढलेल्या गवताचा लिलाव करायचा.त्यातून मिळणारे पैसे तालमीच्या डागडुजीसाठी वापरायचे.अशी त्या काळची रीत होती.या सगळ्या खटपटी करण्यात पै.मारुती वारके यांचा पुढाकार असायचा.
गावात अनेक मारुती वारके आहेत.अोळखू येण्यासाठी लोक पै.मारुती वारके यांना पैलवान किंवा दाढीवाला म्हणायचे.नंतर नंतर तर लोक त्यांना केवळ दाढीवालाच म्हणू लागले.
एखादा पैलवान तयार व्हावा;एखादा शाहीर तयार व्हावा;एखादा हलगी वादक तयार व्हावा;दांडपट्टा फिरविणारा तयार व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती.
मुलांनी या कला शिकाव्यात अशी तळमळ होती.पण टी.व्ही.आणि व्हाॅट्सपच्या जमान्यात त्यांच्याकडे कोणी फिरकलेच नाही.
बर्याच वेळी त्यांनी लेझीम पथक स्थापन्याचा प्रयत्न केला.काही तरुण मुलं त्यात सहभागी झाली.
दत्तपंथी भजनात ते ढोलकीची साथ करीत असत.या भजनात ते ढोलकी मोठ्या खुबीने वाजवत असत.”दत्त दर्शनला जायाचं”हे भक्तीगीत गावं तर वस्तादानीच.खड्या आवाजात.खड्या आवाजात गाणारी काही मोजकी मंडळी गावात आहेत.वस्ताद त्यापैकी होते.
नागपंचमी सणानिमित्त भरविल्या जाणार्या सोहळ्यात ते “जय जय गजानना गुरुनाथा जय जय गजानना गुरुनाथा”हा गण सादर करीत असत.त्याच्या प्रेरणेतूनच गावात सिकंदर जमादारसारखा शाहीर निर्माण झाला.
या लोककला केवळ शिकून उपयोगाच्या नाहीत तर गावोगावी या कलाविषयक होणार्या स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी व्हावे अशी त्यांची तळमळ होती.
आपल्या हाताखाली शिकलेल्या पैलवानाने एखादी कुस्ती जिंकली.बक्षीस म्हणूनढाल मिळविली.गदा मिळविली.किंवा शाहिराने पदक मिळविले तर त्यांचा ऊर अभिमानाने भरुन येई.
पदरमोड करुन गावोगावी फिरुन अनेक कलावंतांकडून त्यांनी अनेक कला अवगत केल्या होत्या.गावाेगावच्या जत्रा यात्रा फिरुन विविध कला पाहण्याचा छंद त्यांना होता.त्या काळात कला शिकविणारे कोणीच नव्हते.एखाद्याने एखाद्याची कला पाहायची.आणि आत्मसात करायची अशी रीत होती.अशाच रीतीने आत्मसात केलेल्या अनेक कलांचा खजिनाच त्यांच्याकडे होता.