जनता बदलणार नाही याचा विश्वास होता : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कागलमध्ये निराधारांना अनुदान मंजुरीपत्रांचे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
झालेली विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी होती. विरोधक माझा पराभव करणारच म्हणून पाच वर्ष मतदारसंघात फिरत होते. या निवडणुकीत मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न झाला. लोकही म्हणत होते, या निवडणुकीत बदलाचे वारे दिसतय. कुणी कितीही बदलू देत. संपूर्ण जग बदलले तरी गोरगरीब जनता बदलणार नाही हा ठाम विश्वास मला होता, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तुम्ही माझा श्वास आणि प्राण आहात, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये संजय गांधी निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या अशा ४४५ लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीपत्राचे वाटप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गोरगरिब निराधारांची सेवा आत्मीयतेच्या भावनेने आणि तळमळीतूनच करत राहिलो. त्यांच्या सेवेच्या पुण्याईची कवचकुंडले माझ्यासोबत आहेत. राजकीय जीवनाच्या सुरुवातीला सभापती आपल्या दारी, आमदार आपल्या दारी, मंत्री आपल्या दारी अशा संपर्क दौऱ्यामध्ये गावोगावी गेल्यानंतर निराधारांच्या हालअपेष्टा मी जवळून बघितल्या. त्यामुळेच काहीही झाले तरी त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणायचे या इराद्याने काम करीत राहिलो, असेही ते म्हणाले.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुका संजय निराधार गांधी निराधार समितीचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. सुरुवातीला मासिक साठ रुपये अनुदान होते. त्यानंतर १८० रुपये, दोनशे रुपये, सहाशे रुपये असे करीत ते दीड हजार करण्यात यश मिळाले. कोणत्याही परिस्थितीत लवकरच निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन दीड हजारावरून दोन हजार करण्यासाठी, उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकात्वाची वयाची अट ६५ वरून ६० करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, गोरगरीब आणि अनाथांच्या कल्याणाच्या तळमळीतूनच हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांसाठी अनेक योजना आणल्या. कागल तालुक्यात १३ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. महिन्याला सुमारे दीड कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. नेहमी सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत निराधार लोक मुश्रीफांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
शशिकांत खोत म्हणाले, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊच नये यासाठी हसन मुश्रीफ यांनी मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मुश्रीफ यांचा हा निर्णय क्रांतिकारकच आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या योगदानातून तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अडीच लाख मुलींना हे लसीकरण करण्याचे शिवधनुष्य मुश्रीफ यांनी उचलले आहे. त्यांच्या कार्याला मी सलाम करतो, असे सांगून लसीकरणासाठी खोत यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली .
यावेळी शशिकांत खोत यांनी महिलांच्या कॅन्सरमुक्तीच्या लसीकरणासाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.कार्यक्रमास सदाशिव तुकान, राजू आमते, नामदेव मांगले, अंकुश पाटील, साताप्पा कांबळे, सौ. पूनम महाडिक, शिवाजी मगदूम, प्रवीण सोनुले, संजय ठाणेकर, संजय चितारी, बाळासाहेब तुरंबे आदी प्रमुखांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत तानाजी कोराणे यांनी केले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले.