कर्नाटक प्रवेश यासाठी आरटीपीसीआर सक्ती विरोधात कागल शहर राष्ट्रवादीची आंदोलने; कोगनोळी टोल नाक्यावर तासभर रोखला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार; महाराष्ट्र -कर्नाटक सीमा ही काय भारत पाकिस्तानची सीमा आहे काय?

कागल :
कर्नाटकात प्रवेशासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर सक्ती विरोधात कागल शहर राष्ट्रवादीने आंदोलन केले. कोगनोळी टोल नाक्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -चार तासभर रोखून धरला. तणावग्रस्त वातावरणामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक, बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व पोलिसांचा प्रचंड फौजफाटा कोगनोळी नाक्यावर दाखल झाला होता.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना भैय्या माने यांनी जाब विचारला की, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ही काय भारत-पाकिस्तान सीमा आहे काय? त्यावर कर्नाटक प्रशासनाचे अधिकारी निरुत्तर झाले.
तसेच येत्या दोन ते तीन दिवसात ही जुलमी दडपशाही कर्नाटक सरकारने थांबवून ही सक्ती माघार घेतली नाही तर महाराष्ट्रातही कर्नाटकाची वाहने येऊ देणार नसल्याचा इशाराही यावेळी श्री. माने यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक आनंदराव पसारे, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक सतीश घाडगे, सागर गुरव, संजय ठाणेकर, सुनील माळी, बच्चन कांबळे, अजित निंबाळकर आदी प्रमुख सहभागी झाले.
गावाच्या वेशीवरच बंदी करा……
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टच्या सक्तीचे कारण विचारताच कर्नाटकचे अधिकारी कोरोना रोखण्यासाठीच आमची ही मोहीम असल्याचे स्पष्टीकरण देत होते. यावर श्री. माने यांनी त्यांना ठणकावून सांगितले की, महामार्ग रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोरोना रोखायचा असेल तर तुमच्या राज्यातील गावागावांच्या प्रवेशद्वारावरच बंदी करा. कोल्हापूरकडून महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील पलिकडील कागल तालुक्यासह आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये जाणाऱ्या तसेच गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही कुचंबना होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.