विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदवी, शाळांचे बनावट दाखले तयार करून देणारे रॅकेट नगरमध्ये उघड , एकास अटक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नावाने दहावी व बारावीची बनावट गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, तसेच विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदवी, शाळांचे बनावट दाखले तयार करून त्यांची नगरमध्ये ५० ते ६० हजार रुपयांना विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.
नगर शहरातील रुद्र एज्युकेशन सोसायटीच्या पॅरामेडिकल कॉलेजमधील अशोक नामदेव सोनवणे (३७, रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून काही गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, दाखले, मोबाइल जप्त केले आहेत. न्यायालयाने त्याला २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशाल पारधे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली होता. अशोक सोनवणे याने बीएससी एमएलटीचे बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी या अर्जाची चौकशी करत पारधे यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर अशोक सोनवणे यास चौकशीसाठी बोलावले.
चौकशी सुरू असतानाच सोनवणे यास मोबाइलवर आलेल्या कॉलचा संशय आल्याने पोलिसांनी फोनची माहिती घेतली. कुरिअर कंपनीचा फोन असल्याचे समजताच पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयात जाऊन आलेले पार्सल ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेची इयत्ता दहावी व बारावीची प्रमाणपत्रे आढळून आली. ती बनावट असल्याचे समोर आले. आराेपी सोनवणेला काेर्टाने २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दिल्लीतील दोघांकडून तयार केली कागदपत्रे
आरोपी सोनवणे याने बनावट गुणपत्रके, प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे दिल्ली येथील सचिन व चेतन शर्मा यांच्याकडून तयार करून घेतल्याचे समोर आले आहे. तसेच यापूर्वी आरोपीने शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आदी विद्यापिठांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून ती ५० ते ६० हजार रुपयांना विक्री केल्याचेही समोर आले आहे.