ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामविकास विभागाकडून 50 लाखांचा निधी देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते .

व्यासपीठावर खा. संजय मंडलिक, आ. ऋतूराज पाटील, सरपंच सागर भोगम, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, सदस्य सर्वश्री शशिकांत चुयेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, करवीर पं.स. सभापती मंगल पाटील, आदी उपस्थित होते .

श्री मुश्रीफ म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांनी मनरेगामधून पाणंद रस्ते निर्मितीचे नियोजन करावे. राज्यातील 4 लाख 20 हजार असंघटीत कर्मचाऱ्यांना आपल्या विभागामार्फत संरक्षण देण्याचा आपला मानस आहे. हदवाढ भागात समाविष्ट होण्यासाठी कळंबे गावातील ग्रामस्थांनी सकारात्मकतेने विचार करावा, असे आवाहन करून उपस्थित नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

तर पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ग्रामपंचायत ही ग्राम विकासाचे द्वार दाखवणारी संस्था आहे. कळंबे गावच्या विकासासाठी आर्थिक निधी कमी पडू देणार नाही. ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत उभारणीकरिता 25/15 योजनेंतर्गत 50 लाखांचा निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून विद्यमान खासदारांनी या प्रस्तावित इमारतीसाठी 25 लाखांचा निधी दयावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी कोविडचा पहिला डोस घेतला नाही, अशा नागरिकांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले .

याप्रसंगी खा.संजय मंडलिक,आ .ऋतूराज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ही नूतन इमारत लवकरच उभारण्यात येणार आहे. याप्रसंगी महसूल विभागाकडून प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी उपसरपंच शालिनी पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, मिनाक्षी पाटील यांच्यासह, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच श्री. भोगम तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक दिलीप तेलवी यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks