अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची अशी असणार नियमावली : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
7 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितली नियमावली कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांना ऑनलाईन बुकींग करून श्री अंबाबाईचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून प्रत्येक तासाला अंदाजे पाचशे भाविकांना दर्शन घेता येईल.
नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने कोल्हापूर शहरात व श्री अंबाबाई मंदिर परिसरात गर्दी होऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस विभागाने योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिनांक 5 ऑक्टोबर पासून ऑनलाईन बुकिंग करण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला दिनांक 7, 8 व 9 ऑक्टोबर 2021 अशा तीन दिवसाचे ऑनलाईन बुकिंग भाविकांना करता येणार आहे. त्यानंतर पुढील दिवसांचे बुकिंग हे करता येईल. ऑनलाईन बुकिंग साठी लवकरच लिंक उपलब्ध करून देण्यात येईल.
आई अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने भावीक त्यांना दिलेल्या स्लॉट प्रमाणे दर्शनासाठी मंदिरात येतील, त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची अधिक गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाच्या नियमावलीचे ही पालन करणे शक्य होणार आहे.
नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने मंदिरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात यामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घेण्याचे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी
दिले आहेत.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.