रोहन कांबळे अथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

बिद्री प्रतिनिधी :
नैरोबी ( केनिया ) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा रोहन गौतम कांबळे हा पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. आज झालेल्या प्राथमिक फेरीतून २४ खेळाडूंची उपांत्य फेरीसाठी निवड झाली असून उपांत्य फेरीत दाखल होणारा तो भारताचा एकमेव खेळाडू आहे.
रोहन गौतम कांबळे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री ( ता. कागल ) येथील असून अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून तो पुढे आला आहे. तीव्र इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हर्डल्स प्रकारात सहभागी होणारा तो जिल्हयातील पहिलाच खेळाडू आहे.
रोहन हा बिद्रीच्याच दूधसाखर महाविद्यालयात बी.ए. भाग एकच्या वर्गात शिकत आहे. सध्या तो शिवाजी विद्यापिठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर अभिजित मस्कर, आश्लेष मस्कर यांच्या तर महाविद्यालयाच्या मैदानावर रामदास फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. रोहनला केनियातीत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्रामस्थ व त्याच्या शिक्षकांनी वर्गणी काढून आर्थिक स्वरुपात मदत केली आहे.
२१ ऑगस्ट रोजी उपांत्य फेरी होणार असून त्यानंतर अंतिम फेरी होईल. त्याच्या या फेरीतील कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.