महा वनौषधी प्रकल्प आराखड्याचे केंद्रीय पर्यटन, बंदर विकास राज्यमंत्री तसेच पहिले आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचेकडून कौतुक.
महा सीएसआर डेव्हलपमेंट असोसिएशन, इंडियाच्या नियोजित महा वनौषधी निर्मिती, संवर्धन, संशोधन, पर्यटन, उपचार, प्रशिक्षण केंद्र कृती प्रकल्प आराखड्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले. यावेळी ते बोलत होते. हा प्रकल्प काळम्मावाडी राधानगरी जंगल परिसरात साकारत आहे.

पणजी :
उज्ज्वल भविष्यासाठी, पर्यावरण संतुलनासाठी दुर्मिळ वनौषधींची लागवड, संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन, बंदर विकास राज्यमंत्री तसेच पहिले आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पर्यटन भवनमधील कार्यक्रमात गुरुवारी (ता.१८) केले.
महा सीएसआर डेव्हलपमेंट असोसिएशन, इंडियाच्या नियोजित महा वनौषधी निर्मिती, संवर्धन, संशोधन, पर्यटन, उपचार, प्रशिक्षण केंद्र कृती प्रकल्प आराखड्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले. यावेळी ते बोलत होते. हा प्रकल्प काळम्मावाडी राधानगरी जंगल परिसरात साकारत आहे.

दरम्यान, केंद्रीय पर्यटन, बंदर विकास राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या समोर प्रकल्पाचे सादरीकरण निकाल न्यूजचे मुख्य संपादक मंगेश कोरे यांनी संगणकप्रणालीद्वारे केले. महाराष्ट्रामध्ये केलेल्या जैवविविधता संवर्धन व संगोपन प्रकल्पाची माहिती महाराष्ट्र एनजीओ समितीचे अध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिली. तर आयुर्वेदामध्ये सर्वाधिक औषधी गुणधर्म असणारी वनस्पती गुळवेल विषयी माहिती व गुळवेल वनस्पतीपासून तयार केलेल्या ‘गुळवेल जीवनामृत’ या सत्वासंदर्भात व आयुर्वेदाचे महत्व यावर आयुर्वेदाचार्य नारायण डवर यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली.
या प्रसंगी प्रकल्पाचे संचालक योगेश दिंडे यांनी प्रकाल्पाचे ध्येय व उद्दिष्ट्ये यासंदर्भात थोडक्यात माहिती दिली.
यावेळी मानद सल्लागार अॅड. किशोर शेट मांद्रेकर, महाराष्ट्र एनजीओ समितीचे संपर्क प्रमुख संदीप बोटे,स्वराज्य एनजीओ जनसंपर्क प्रमुख अमित कोरे व अवधूत विभुते उपस्थित होते.
मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्मिळ औषधी वनस्पती, झाडे आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याबरोबरच औषध निर्मिती त्याचे लोकांपर्यंत वितरण महत्वाचे आहे. काळाच्या ओघात माणूस पारंपरिक वनौषधी उपचारांपासून लांब जात आहे. त्यामुळे वनौषधी प्रकल्पाच्या माध्यमातून औषधी परंपरा जोपासली जाईल. डोंगर, जंगल भागात मिळणाऱ्या भाज्यांचेही संवर्धन या महा वनौषधी प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असल्याने हा स्तुत्य उपक्रम आहे.
केंद्रीय मंत्रालयातर्फे वनौषधी उत्पादनांना जास्तीतजास्त बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही श्रीपाद नाईक यांनी यावेळी दिली.
यावेळी शिष्टमंडळा कडून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना कोल्हापुरी गुळ भेट देण्यात आला.
अॅड. किशोर शेट मांद्रेकर म्हणाले, तरूण पिढीने नोकऱ्यांच्या मागे न लागता, पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून रोजगार निवडावा. आयुर्वेदाचे महत्त्व पिढ्यानपिढ्या अबाधित राहणार आहे. त्यामुळे वनौषधी प्रकल्पाला उज्ज्वल भविष्य आहे.
युवराज येडूरे म्हणाले, वनौषधींची लागवड, संवर्धन करण्याबरोबरच संशोधन करण्यात येणार आहे. या संशोधनाचा फायदा देशाच्या आरोग्य क्षेत्रासाठी व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून पारंपरिक आयुर्वेदिक औषध उपचार पद्धतीची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. व्याधीग्रस्तांवर प्रभावीपणे निसर्गोपचार करण्याबरोबरच त्यांच्या आहारात जंगली (रान) भाज्यांचा समावेश करण्यात येईल. रुग्णांमध्ये नैसर्गिक पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, यावर अधिक भर असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.