ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी संपाबाबत मोठी बातमी, हायकोर्टाने दिले महत्वपूर्ण आदेश..!

मुंबई ऑनलाईन :

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून संपावर गेलेले आहेत. याबाबत नेमलेल्या समितीने एसटीचे शासनात विलिनीकरण करता येणार नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे.

त्याच वेळी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे कर्मचारी काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असताना, एक मोठी बातमी समोर येत आहे..

त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल (high court case status) राज्य सरकारने स्वीकारला की नाही, याबाबत 22 मार्च रोजी स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्याच वेळी 22 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई करू नये, असे तोंडी निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने महामंडळाला दिले आहेत.

एसटी संप न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतरही कर्मचारी गेल्या 4 महिन्यांपासून संपावर आहेत. त्यामुळे महामंडळाने दाखल केलेल्या न्यायालय अवमान याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी विशेष सरकारी वकील शैलेश नायडू व मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी खंडपीठाला सांगितले, की ‘त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. परिवहनमंत्र्यांनी 4 मार्च रोजी तो दोन्ही सभागृहांत मांडला..’

त्यावर समितीने अहवालात केलेल्या शिफारशी स्वीकारायच्या की नाही, याचा अंतिम निर्णय कधी घेणार, अशी विचारणा खंडपीठाने केली असता, तो निर्णय लवकरच घेणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी दुखवट्यावर असलेल्या कष्टकरी कर्मचाऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करु नये, अशी विनंतीही सदावर्ते यांनी केली होती. त्यानुसार कोर्टाने आदेश दिला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks