कोल्हापुरात निर्बंध शिथिल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी :
जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून खुली किंवा बंदिस्त उपाहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास आज परवानगी देण्यात आली. चित्रपट- नाट्यगृहे, मल्टिप्लेक्ससह धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. सर्व दुकाने, मॉल्स रात्री दहापर्यंत खुली ठेवण्यास परवानगी असून, येथे काम करणाऱ्यांसह ग्राहकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. खुल्या मंगल कार्यालयांत आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा २००; तर बंदिस्त मंगल कार्यालयांत आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० व्यक्तींना परवानगी आहे. या संदर्भातील आदेश आज रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले.
उपाहारगृहे, बार रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येतील. तेथे शेवटची ऑर्डर नऊपर्यंत घ्यावी, मात्र पार्सल सेवा २४ तास सुरू असेल. दुकाने व शॉपिंग मॉल्समध्ये लसीकरण प्रमाणपत्र व छायाचित्रासह ओळखपत्र दाखविणे आवश्यक राहील. वातानुकूलित तसेच विना वातानुकूलित जिम्नॅशियम, योगा सेंटर, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. इनडोअर खेळांसाठी कर्मचारी व खेळाडूंसाठी दोन्ही डोस घेऊन १४ दिवस होणे आवश्यक आहे. तेथील हवा खेळती हवी. बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब अशाच खेळांसाठी खेळाडूंना परवानगी असेल.
सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना, बँक, रेल्वे आदी ठिकाणच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करावे. खासगी कार्यालये वेळेच्या व्यवस्थापनासाठी २४ तास सुरू ठेवता येतील. मात्र, एका सत्रात २५ टक्के उपस्थिती मर्यादित आहे. दोन्ही डोस झालेल्यांना राज्यात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे यावरील निर्बंध कायम आहेत.