कागलमध्ये दिल्ली पॅटर्न कार्यशाळेला प्रतिसाद; गुणवंत विद्यार्थी घडवण्याची पालकांसह शिक्षकांचीही नैतिक जबाबदारी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा.

कागल :
दर्जेदार व गुणवत्त विद्यार्थी घडवण्याची पालकांसह शिक्षकांचीही नैतिक जबाबदारी आहे, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर सबंध राज्यातील शाळा विकसित करू, असेही ते पुढे म्हणाले.
कागलमध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात आयोजित
सरपंच, शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष ,पालक व शिक्षकांच्या एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षात धोरणामुळे शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. सरकारची आर्थिक स्त्रोत आटलेली आहेत अशा परिस्थितीतही सरकारचा निधी आणि लोकसहभागातून शाळा सुंदर बनवूया या प्रकल्पाची सुरुवात म्हणून कागल तालुक्यातील पंधरा शाळा कंपन्यांच्या सीएसआर फंडातून दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर सुंदर बनवू असे ते म्हणाले.
“गुणवत्ता सुधारा…….
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, दिल्ली पॅटर्नचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती नेमलेली आहे. ही समिती दिल्लीतील शाळांना भेट देऊन अहवाल सादर करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या अहवालावर चर्चा करू. शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सुधारण्याचा कार्यक्रम राज्यभर लागू करू. सरकारच्या वतीने लागतील त्या भौतिक सुविधा देऊ शिक्षक आणि फक्त गुणवत्ता सुधारावी असे आवाहनही त्यांनी केले. .
“अंतर्बाह्य सर्वांगसुंदर शाळा……….”
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शिक्षकांना बहुआयामी बनविण्याचा मानस आहे. मुख्याध्यापकांचा नेतृत्व गुण अधिकाधिक विकसित करण्याची गरज आहे. शंभर वर्षांपूर्वी मोफत शिक्षणाची सोय करणाऱ्या छत्रपती शाहूंच्या जन्मभूमीतच हसन मुश्रीफ यांच्यासारखे बहुजन हिताय शिक्षणाला महत्त्व देणारे व्यक्तीमत्व उदयाला आले. सुंदर माझी शाळा हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्वच १९७६ शाळा अंतरबाहय सर्वांगसुंदर बनविण्याचा निर्धार आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने सुरू असलेला शिक्षणाचा कागल पॅटर्न सबंध महाराष्ट्राला पथदर्शी ठरेल.
स्वागतपर भाषणात गट शिक्षणाधिकारी कमळकर म्हणाले, शैक्षणिक उपक्रम आणि आम्ही शिक्षण विषयक सुधारणांमध्ये ग्रामविकास मंत्री हसन साहेब मुश्रीफ यांचे योगदान व पाठबळ नेहमीच असते. दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर शिक्षणाचा कागल पॅटर्न विकसित करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ सुनीलकुमार लवटे, जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, पंचायत समितीच्या उपसभापती सौ मनीषा सावंत, माजी सभापती रमेश तोडकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, राजू माने आदी प्रमुख उपस्थित होते.