पेपर फुटल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

टीम ऑनलाईन :
पेपरफुटीच्या घटनांत एखादी शाळा दोषी आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल. तर दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर कॉपी अथवा समूह कॉपीचा प्रकार आढळून आल्यास अशा शाळांचे परीक्षा केंद्रही रद्द केले जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. राज्यात दहावी, बारावीसह विविध परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांत अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. डिजिटल साधने उपलब्ध झाल्याने व्हॉट्स अॅपसारख्या माध्यमातून काही मिनिटांत सर्वत्र पेपर पोहोचवला जातो. मागील काळात शासकीय नोकर भरती परीक्षांतसुद्धा गोंधळ झाल्याने काही परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली. अशा घटनांमुळे परीक्षा घेणार्या यंत्रणांचा गोंधळ उडतो, तर दुसरीकडे सरकारचीही नाचक्की होते. आता बारावीची परीक्षा सुरू असतानाच विविध ठिकाणी पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरले.त्यावर निवेदन करताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, बारावीच्या परीक्षांचे पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्यानंतर सर्व पातळ्यांवर चौकशी करण्यात येत आहे. बहुतांश ठिकाणी पेपर फुटला नसून, कॉपी झाल्याचे समोर आले आहे. काहीजणांना चौकशीसाठी चपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापुढे परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.