मनसेची वाघीण म्हणून ओळख असणाऱ्या रुपाली पाटील यांनी मनसे सोडली; ‘या’ पक्षात करणार प्रवेश
पक्षात घुसमट झाल्यानेच जय महाराष्ट्र करीत असल्याचे रुपाली पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात स्पष्ट केले.

मुंबई :
पुणे महापालिकेत बस्तान बसविण्याच्या तयारीने दौऱ्यावर येणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासाठी ‘गिफ्ट’ तयार झाले असून, मनसेच्या (MNS) माजी नगरसेविका आणि महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह पदाचाही राजीनामा तयार करून वरिष्ठांकडे पाठवला आहे. पक्षात घुसमट झाल्यानेच जय महाराष्ट्र करीत असल्याचे रुपाली पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात स्पष्ट केले.
राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, याची चर्चा रंगली आहे. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले आहे. मूळ वकील असलेल्या रुपाली या मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १४ वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. या काळात महापालिकेच्या २०१२ निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. त्यानंतरच्या २०१७ च्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला तरीही त्या राजकारणात सक्रिया राहिल्या आणि विधानसभेच्या २०१९ निवडणुकीत त्या कसबा मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या.
त्यांच्याऐवजी तेव्हाचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि रुपाली पक्ष नेतृत्वावर नाराज झाल्या. भाजपच्या नेत्यांशी सेटिंग करून आपले तिकिट कापल्याची भावना त्यांच्या मनात होती. रुपाली यांची नाराजी ओळखून पक्षाने त्यांच्यावर महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, ती पार पाडताना त्या अधिक आक्रमक झाल्या. दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातूनही रुपाली यांनी नशिब आजमविले. मात्र, त्या पराभूत झाल्या. या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांनी ‘मनसे’ साथ दिली नसल्याची खंत त्या खासगी बोलून दाखवत होत्या. पक्ष सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. मात्र, हे पद काढण्याआधी काही मिनिटेच कल्पना दिली आणि खरेतर पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढल्याचा आरोप रुपाली यांनी उघडपणे केला होता.
त्यामुळे त्या राज यांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसे संकेतही त्यांनी एका मुलाखतीत दिले होते, मात्र राज यांच्यासोबतच काम करणार असल्याची सारवासारव करीत, त्या मनसेत सक्रिय राहिल्या. तरीही त्या अस्वस्थच होत्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात येत होते. त्याआधीच मंगळवारी दुपारी वरूण सरदेसाई यांची भेट घेतल्याने त्या शिवबंधन बांधणार असल्याचे मानले जात आहे. मनसेत प्रचंड नाराजी असलेल्या पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषत: उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होत्या. पवार-रुपाली पाटील यांच्या भेटीत पक्ष प्रवेशाचीही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रूपाली या पुढच्या दोन दिवसात कोणत्या नव्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता आहे.