सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामार्फत मुरगूड पोलीस बांधवांसमवेत ‘रक्षाबंधन’ उपक्रम साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथील समाजशास्त्र विभागामार्फत मुरगुड पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांच्या समवेत रक्षाबंधन हा उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राख्या बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी पोलीस हवालदार संदीप ढेकळे म्हणाले की, ‘रक्षाबंधन’ हा उपक्रम बहिण भावाचे सुंदर असे नाते आहे. आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी मोठ्या भावासारखे तुमच्या रक्षणासाठी उभे आहोत. आम्हाला तुमच्यातीलच एक मित्र, भाऊ व मार्गदर्शक समजून तुम्ही कोणत्याही स्वरूपात पोलिसांच्याकडे मदत घेऊ शकता असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. दिपाली सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश व्यक्त केला. याप्रसंगी स्वाती मगदूम, योगिता आंग्रे, अस्मिता तेलवेकर, गौरी परीट व आरती या विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत असताना सांगितले की, ‘रक्षा’ म्हणजे ‘संरक्षण’ आणि ‘बंधन’ म्हणजे ‘बांधिलकी’. म्हणजेच ‘संरक्षणाची बांधिलकी’ या शब्दातूनच भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या या सणाचे महत्त्व समजते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व पोलीस बांधवांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम साजरा करून त्यांच्या योगदानाला आपण सलाम करत आहोत असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मनिषा पाटील यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. बी. पोवार, इतिहास विभाग प्रमुख डॉ. पी. आर. फराकटे, तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे व सर्व पोलीस बांधव उपस्थित होते.