युवकाच्या मृत्यूस जबाबदार तपास अधिकारी व मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा ; शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

अकोट (जि. अकोला) शिवराज गावंडे याच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याने मुलाने आत्महत्या केल्याच्या आरोप त्याच्या आईने केला आहे. युवकावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर तसेच पोलिसांना या प्रकरणात मदत करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवराज प्रकाश गावंडे या युवकाची आई नलिनी गावंडे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. युवराजने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिवराज विरुद्ध तक्रार देणाऱ्या संदिप नामदेव गावंडे (अकोला) यांचा बाळापूर मार्गावरील टाटा मोटर्सनजिक दुचाकीला अपघात झाला होता. त्या अपघाताला जबाबदार ठरवून शिवराज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातग्रस्त दुचाकी गजानन भुजंगराव कुलट यांच्या मालकीची आहे. पोलिसांनी दुचाकी मालकासह संगतमन करून युवराजविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खोट्या माहितीवरून तपास अधिकारी गणेश कराळे यांनी शिवराज गावंडे याला चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात गोवले. अटक टाळायची असेल तर तीस हजार रुपये दे असे शिवराजला धमकावले होते. अटकेच्या भितीने दागीने गहाण ठेऊन शिवराज याने थोडेफार पैसे जमवले. 25 हजार रुपये घेतल्यानंतर शिवराज याला समजपत्रावर सोडले. खऱ्या गुन्हेगाराला सोडून आर्थिक फायद्यासाठी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे शिवराज यांच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
वारंवार धमकी देत त्याच्यावर दहशत बसविण्याचा प्रयत्न केला. तपास अधिकाऱ्यांनी दुचाकी मालक व त्याच्या नातेवाईकांच्या फायद्याकरीता मुलाला खोट्या गुन्ह्यात अडविकले असल्याचे मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दुचाकी मालकाचे जवळचे नातेवाईक पोलिस खात्यात असल्याने तपास अधिकारी या ना कारणाने संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाहीत.
मुलाने आत्महत्या केली नसून तपास अधिकारी, वाहन मालक व त्याचे जवळचे मदत करणाऱ्यांनी कट रचून मुलाची एक प्रकारे हत्याच केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी मृत शिवराज याच्या आईने तक्रारीद्वारे केली आहे.
या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा संघटनेकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यात जेथे जेथे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे काम चालते तेथे-तेथे या संदर्भात आंदोलन केले जाईल, असा इशारा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.