महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ही मराठी माध्यमातुन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी

प्रतिनिधी : प्रतिश पाटील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचे आयोजन करून महाराष्ट्र कृषी सेवा, गट ‘अ’ व गट ‘ब’ या मधील पदांवर नियुक्ती केली जाते. यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यान विद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता, या भरतीकरिता शैक्षणिक अर्हता मान्य केल्या आहेत.या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत केले जाते.
ह्या परीक्षेचे पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा मुलाखत अशा तीन टप्प्यात आयोजन करून उमेदवारांची निवड करण्यात येते. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोग ह्या परीक्षेची मुख्य परीक्षा केवळ इंग्रजी माध्यमातून घेत असल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून बी एस्सी कृषी व उद्यानविद्या पदवी घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होत आहे. सदर विद्यापीठाच्या माध्यमातून शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे मराठी माध्यमातून शिकवले जातात.
सदरचे अभ्यासक्रम हे कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी समतुल्य आहे.मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिकवले जाणारे हे अभ्यासक्रम तितकेच दर्जेदार शिकवले जातात . महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे राज्यसेवा परीक्षा ही मराठी व इंग्रजी या माध्यमातून घेते.
महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी सल्ला हा मराठी भाषेतूनच दिला जातो त्यामुळे सदरची मुख्य परीक्षा हे मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून घेण्यात यावी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावरील अन्याय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्वरित दूर करावा अशी मागणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे .