गोकुळ दूध संघाची टेम्पोतील दूधचोरी उत्पादकांनी रंगेहाथ पकडली ; चालक व क्लीनर पसार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गोकुळ दूध संघाची दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दूध चोरी कौलगे (ता. कागल) येथील दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधी यांनी बुधवारी रात्री रंगेहाथ पकडली. टेम्पो निर्जन माळरानात थांबवून त्यातील दूध एका कॅनमधून किटलीने काढले जात होते. टेम्पो चालक व क्लीनर मात्र पसार झाले आहे. या प्रकाराचा दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.
याबाबत माहिती अशी : कौलगे येथील दूध संस्थांच्या दुधाची प्रत सातत्याने कमी येत होती. त्याचा मोठा आर्थिक फटकादेखील सोसावा लागत होता. उत्पादक प्रामाणिकपणे दूध पुरवठा करतात, तरीही असे का घडते, या विचाराने शंका येऊन टेम्पोवर पाळत ठेवली होती. त्यावेळी कौलगे येथील दोघांना खडकेवाडा येथील भैरी मंदिरानजीक टेम्पो (एमएच ०९ एल ५०३२) थांबून त्यातील कॅनमधून दूध काढले जात असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला ; पण थांबला नाही.
टेम्पो बेळंकी येथे गेल्यानंतर चालक व क्लिनर पसार झाले; मात्र ती किटली तशीच होती. हा प्रकार समजताच गोकुळ दूध संघाचे सहायक संकलन अधिकारी सी. एस. घाळी, सीनिअर सुपरवायझर एस. एम. सुळकुडे, सुपरवायझर आर. बी. लाडगावकर, आर. बी. घाटगे, आर. ए. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. टेम्पो चालकाचे नाव विनोद शिंदे (रा. कोडणी) असल्याचा उल्लेख संघाच्या पंचनाम्यात आहे.