शिये येथील आय.ओ.एन. डिजिटल परीक्षा केंद्र रद्द करून केंद्र चालकांवर गुन्हा नोंद करा व वनरक्षक पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अन्यथा परीक्षा केंद्राला टाळे ठोक आंदोलन : संभाजी ब्रिगेडचा इशारा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
3 ऑगस्ट रोजी शिये येथील आय ओ एन डिजिटल परीक्षा केंद्रावर वनरक्षक पदासाठी परीक्षा होती. यादरम्यान केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला. त्याचबरोबर एका विद्यार्थ्यावर देखील गुन्हा नोंद झाल्याची घटना समोर आली.
एवढ्या मोठ्या परीक्षा केंद्रावर मोबाईल आत मध्ये गेलाच कसा असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यामुळे आय.ओ. एन केंद्र चालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे.
जानेवारी महिन्यामध्ये परीक्षार्थींना फक्त दोन मिनिटं वेळ झाला. या कारणासाठी केंद्र चालकांनी 70 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नव्हते अशा काटेकोरपणे नियम लावणाऱ्या केंद्र चालकांनी मोबाईल मधून कॉपी करण्यासाठी सहकार्य केले का असा सवाल संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी केला.
जानेवारी महिन्यामध्ये परीक्षार्थींना दोन मिनिट वेळ झाला या कारणासाठी 70 विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेला बसू दिले नव्हते त्यावेळी आम्ही केंद्र मध्यवस्तीत आणावे अशी मागणी केली होती जर केंद्र चालक एवढ्या तत्परतेने आणि काटेकोरपणाने दोन मिनिट उशिरा झाल्याच्या कारणामुळे 70 विद्यार्थ्यांचे नुकसान करत असतील तर मोबाईल घेऊन कॉपी ला सहकार्य करणाऱ्या केंद्र चालकांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .
त्याचबरोबर आय.ओ.एन. डिजिटल परीक्षा केंद्र रद्द करून स्वतंत्र केंद्र मध्यवस्तीत सुरू करावे व नुकसान झालेल्या वनरक्षक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना करण्यात आली.
पंधरा दिवसांमध्ये आय.ओ .एन डिजिटल परीक्षा केंद्रावर कारवाई झाली नाही तर केंद्राला टाळे ठोक आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार (दक्षिण), जिल्हाध्यक्ष संदीप यादव (उत्तर), जिल्हा कार्याध्यक्ष भगवान कोइंगडे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष खोत ,करवीर तालुकाध्यक्ष अमर पाटील दत्ता मेटील, संजय पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.