प्रा. चंद्रकांत जाधव म्हणजे हाडाचा सच्चा कार्यकर्ता : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार; सेवानिवृत्तीपर गौरव सोहळा मुरगूडमध्ये उत्साहात संपन्न.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूडचे प्रा. चंद्रकांत जाधव हे उत्कृष्ट क्रीडाशिक्षक तर आहेतच. तसेच, ते हाडाचे सच्चे कार्यकर्तेही आहेत, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. कोजिमाशि संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मुरगुडमध्ये सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून नामदार श्री. मुश्रीफ यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, दूधसाखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, दत्तामामा खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, नंदकिशोर सूर्यवंशी, प्रवीणसिंह भोसले, उमेशराव भोईटे आदी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, श्री. जाधव क्रीडाशिक्षक झाले नसते तर चांगले मनोवैज्ञानिक झाले असते, एवढा त्यांचा स्वभाव अष्टपैलू आहे. सेवानिवृत्तीच्या आयुष्यात त्यांनी सामाजिक कार्यात कार्यरत राहून समाजाला त्यांच्या कौशल्याचे योगदान द्यावे.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, क्रीडाशिक्षक म्हणून त्यांचे काम गौरवास्पद आहेच. परंतु; झोकून देऊन समाजकार्य करणारे ते सामाजिक कार्यकर्तेही आहेत.
सत्काराला उत्तर देताना प्रा. जाधव म्हणाले, वडील विष्णुपंत, आई सोनाबाई, भाऊ-बहिणी आणि कुटुंबाचे प्रेम आणि प्रोत्साहनामुळेच सतत कार्यरत राहिलो. ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफसाहेब, के. पी. पाटीलसाहेब व प्रवीणसिंह पाटीलसाहेब यांनी या पुढेही असाच प्रेमाने माझा सांभाळ करावा.
यावेळी जीवन साळोखे यांचेही भाषण झाले.
स्वागत प्रा. सुनील डेळेकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. आनंद वारके यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार अनिल पाटील यांनी केले. आभार ॲड. सुधीर सावर्डेकर यांनी मानले.