‘आप’चे हनुमानाला साकडे!; ‘मारुतीराया.. प्रभू श्रीरामांच्या नावावर घोटाळा करणाऱ्यांना शिक्षा कर’

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत भव्य राममंदिराची उभारणी होणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील अनेक रामभक्तांनी देणगी मोहिमेत सहभाग नोंदवला. यामध्ये एप्रिलपर्यंत देणगी स्वरूपात साडेपाच हजार कोटी रुपये जमा झाले. मंदिर उभारणीचे काम रामजन्मभूमी न्यासाच्या वतीने सुरू असताना यामधील काही सदस्यांनी राममंदिरासाठी लागणारी अतिरिक्त जमीन खरेदी करताना दोन कोटी रुपयांची जमीन तब्बल साडे अठरा कोटींना विकत घेऊन घोटाळा केला असल्याचा आरोप ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी लगावला. या आरोपांमुळे जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
राममंदिर घोटाळ्यात सामील असलेल्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व रामभक्तांकडून सरकारकडे केली जात आहे. परंतु यावर सरकारमधील सर्वांची चुप्पी आहे. यामुळे आम आदमी पार्टीने आज उभा मारुती चौक येथील हनुमान मंदिरात जाऊन आरती केली व मारुतीला साकडे घातले. राममंदिर घोटाळ्यात सामील असलेल्यांना सरकार शिक्षा करणार नाही, पण मारुतीराया तू त्यांना शिक्षा कर, राममंदिराचे काम लवकर पूर्ण होउदे, त्यामध्ये येणारे सगळे विघ्न टळूदेत असे साकडे ‘आप’ने घातले.
प्रभू श्रीरामांच्या नावावर जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याला आम्ही कडाडून विरोध करू असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.
यावेळी उत्तम पाटील, संतोष घाटगे, पल्लवी पाटील, विशाल वठारे, बाबुराव बाजारी, विजय भोसले, विजय हेगडे, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, अमित चव्हाण, महेश घोलपे, अश्विनी गुरव, दत्तात्रय सुतार, मंगेश मोहिते, राज कोरगावकर, संतोष चळवंदी, शैलेश पोवार, रवीराज पाटील, दिलीप पाटील, सचिन डाफळे, रामचंद्र गावडे, आदी उपस्थित होते.