आरोग्यताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र
विशाखापट्टणमहून कोल्हापुरात रेल्वेने आला १५ टन ऑक्सिजन

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
गेल्या दोन दिवसांपासून प्रतीक्षा असलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अखेर शुक्रवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाली. विशाखापट्टणम येथून १५ टन घेऊन आलेला हा टँकर खास रेल्वेने कोल्हापुरात पोहोचला.महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही आठ दिवसांत दुपटी तिपटीने वाढली. मागणी व पुरवठा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेेशकडे ऑक्सिजनची मागणी केली होती. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ या नावाने रेल्वे बुधवारीच विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन आणण्यासाठी रवाना झाली. दरम्यान, देशभर ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरून हाहाकार उडाला असल्याने प्रत्येक राज्य, जिल्ह्याकडून अडवणूक होणार असल्याचे गृहीत धरून ही रेल्वे ऑक्सिजन घेऊन कधी पोहोचणार याबाबतीत प्रशासकीय पातळीवर कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.