प्रफुल्लीत बाल-विकास केंद्रातर्फे मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आजच्या डिजिटल युगात मुलांचा सर्वांगीण विकास आणि मानसिक, शारीरिक समतोल साधणे ही मोठी गरज बनली आहे. याच विचारातून प्रफुल्लीत बाल-विकास केंद्र यांच्यावतीने संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६ एप्रिल पासून सुरु होणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक, कोल्हापूर येथे दररोज सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये स्विमिंग, ज्युडो, लाठी-काठी,झुंबा, योगा आणि खेळ,मोटिवेशन सत्र, संभाषण कौशल्य,पुस्तक वाचन, सांघिक उपक्रम यावर अनुभवी तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.१ मे महाराष्ट्र दिनी शिबिराचा समारोप व बक्षीस समारंभ आयोजित करण्यात येणार असून, मुलांनी शिबिरात शिकलेल्या नृत्य, गायन, अभिनय, आणि इतर कलागुणांचे सादरीकरण व विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांना ‘राज्यस्तरीय महारत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
“हे शिबीर म्हणजे मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचं व्यासपीठ आहे,” असं प्रफुल्लीत केंद्राच्या अध्यक्षा डॉ. आल्फिया बागवान यांनी सांगितले.