मुरगुड : पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी मुरगुड मध्ये आठवड्यातून दोनवेळा पाणी कपात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड (ता.कागल) येथे पाणी टंचाई भासू नये यासाठी शहरामध्ये आठवड्यातून दोनवेळा पाणी कपात करण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सरपिराजीराव तलावाची पाणी पातळी अत्यंत वेगाने कमी होत आहे. यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मुरगूड नगरपालिकेने गुरुवार बरोबरच दर रविवारी देखील पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयीची माहिती प्रशासनाधिकारी तथा मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. तलावातील पाणी पातळी १६ फुट इतकी निच्चांकी पातळीवर आली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात भीषण पाणीटंचाईची भीती आहे.
पावसाची अशीच ओढ राहीली तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट येणार आहे. येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी उपलब्ध पाणी काटकसरीने व जपून वापरणे आवश्यक आहे.
शहरामध्ये आठवडयातून दोन दिवस कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. दर रविवारी व गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.