ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण व संवर्धन – काळाची गरज : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

आजच्या युगात मानवाने प्रगतीच्या शिखरावर झेप घेतली असली, तरी पर्यावरणीय समतोल ढासळल्यामुळे संपूर्ण मानवजातीपुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, हवामानातील झपाट्याने होणारे बदल ही या संकटाची मुख्य कारणे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन’ हे केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि नैतिक दृष्टिकोनातून काळाचे अत्यावश्यक कर्तव्य बनले आहे, असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले.

ते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे आणि उपप्राचार्य डॉ. शिवाजी पोवार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. प्रा. दिगंबर गोरे यांनी कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक केले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अद्वैत जोशी, प्रा. दीपक साळुंखे, प्रा. सुशांत पाटील, प्रा स्वप्निल मेंडके , पर्यावरण संसाधन केंद्राचे प्रमुख दादासाहेब सरदेसाई, डॉ. माणिक पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. होडगे पुढे म्हणाले की, वृक्ष केवळ लावणे पुरेसे नाही, तर ते जगवणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही खरी जबाबदारी आहे. वृक्षसंवर्धन हा केवळ उपक्रम नसून, शाश्वत जीवनशैलीचा मूलभूत भाग असायला हवा. विद्यार्थ्यांनी ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ या तत्त्वाशी बांधिलकी बाळगली पाहिजे. यावेळी महाविद्यालय परिसरात दोनशेहून अधिक नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उस्फृतपणे आपल्याकडे घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय हेरवाडे यांनी केले तर आभार प्रा. रामचंद्र पाटील यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks