गावागावातील देवालये बघण्यासाठी राज्यभरातील लोक येतील; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन; देव-देवतांच्या मंदिरांच्या बांधकामाची पुण्याई पाठीशी

सेनापती कापशी :
आजपर्यंत अनेक देवदेवतांच्या मंदिरांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिले. अनेक गावा -गावातील देव-देवतांची ही सुंदर देवालये बघण्यासाठी राज्यभरातील लोक येतील, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. अर्जुनवडा ता. कागल येथे ग्रामदैवत श्री. मरगाई देवी व श्री. भैरवनाथ देवाच्या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सौ. शिल्पाताई शशिकांत खोत होत्या.
भाषणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अर्जुनवाड्यातील हे सुंदर असे मंदिर साकारण्यामध्ये ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वी मंदिर उभारणीसाठी सात लाख रुपये निधी दिला आहे. मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. ग्रामविकास मंत्री पदाचा उपयोग खऱ्या अर्थाने जनतेसाठी कसा होऊ शकतो, हे या पाच वर्षांच्या कालखंडात दाखवून देऊ. कागल, गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामे शिल्लक राहणार नाहीत. मतदारसंघात प्रचंड निधी आणणारा मी देशातील एक नंबरचा मंत्री ठरेल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्यावतीने सरपंच प्रदीप पाटील यांच्या हस्ते मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार झाला
श्रद्धा, आशीर्वाद आणि पुण्याई…….!
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, रस्ते, आरोग्यसेवा, शाळा ही विकासकामे सुरूच आहेत. जनतेची श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांच्या बांधकामांचीही कामे आपण मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. गोरगरीब माणसाच्या कल्याणासाठीच उभी हयात खर्ची घातली. त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आणि सेवा कार्याची ही पुण्याई सदैव माझ्या पाठीशी आहे.
यावेळी सरपंच प्रदिप पाटील, उप सरपंच अजितकुमार पाटील, आर. के. लाडगांवकर, भारत सातवेकर, बळिराम मोरे, रविंद्र लाडगांवकर, जी. जी. पाटील, भिमराव ढोले, टी. जी. पाटील, विशाल कुंभार , ग्रामस्थ व माहेरवाशिणी उपस्थित होत्या.