पर्यावरण रक्षक आम्रवृक्षाचा बेधुंद झालेल्या तरुणाईच्या रस्सा पार्ट्यांनी घेतला जीव . पर्यावरणाचा विध्वंस – विनाशाकडे घेवून जाणारा .- प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार .

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील सरपिराजीराव तलाव परिसरातील माळरानावरील ‘ एकटा ‘ नावाने प्रसिद्ध असलेला आंब्याचा वृक्ष रस्सा पार्टी करणाऱ्या मद्यधुंद तरुणांच्या बेफिकीरपणामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला .आज दिनांक २३ रोजी येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ मुरगूड , शाश्वत विकास चळवळ शाखा कागल तालुका ,तसेच निसर्ग मित्र मंडळ निढोरी यांच्या वतीने . शोकसभा घेण्यात आली . अत्यंत संवेदनशील मनाने तुटलेल्या झाडाच्या बुंध्यावर फुले अर्पण करून कृतज्ञतापूर्वक या झाडास श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले, जागतिक तापमान वाढ आपणास सृष्टीच्या विनाशाचा संकेत देत आहे . तरीही आपण शहाणे होण्यास तयार नाही आहोत . सजीव सृष्टीचा विनाश जवळ येत असून सुद्धा आपण पर्यावरणाचा विध्वंस थांबलेला नाही . त्यामुळे विनाशकाले विपरीत बुद्धि असेच म्हणावे लागेल .
या शोक सभेवेळी बोलतांना वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी म्हणाले, निसर्गाप्रती मानव दिवसेंदिवस कृतघ्न बनत चालला असून, मानवांच्या पालन कर्त्या वृक्षराजींचाच मानवाने विनाश आरंभला आहे . विकासाच्या नावाखाली रस्ता रुंदीकरणातून वृक्षांची प्रचंड कत्तल सुरू झाली आहे . या ठिकाणच्या वृक्षास आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व तुटलेल्या वृक्षांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून आदरांजली वाहत आहोत . हा एक प्रकारे या आंब्याचा वृक्षाचा खून झाला आहे असेच म्हणावे लागेल . या घटनेचा आम्ही सर्व निसर्गप्रेमी जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत . यावेळी कोसळलेल्या आंब्याच्या वृक्ष्याच्या जागेसह माळावरून लोकसहभागातून वृक्षारोपण करणेचा निर्धार व्यक्त केला .
या शोक सभेस सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अर्जुन कुंभार , माजी विस्तार अधिकारी एम टी सामंत , वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी, विकास सावंत, ओमकार कांबळे, मृत्युंजय सूर्यवंशी, सुरज कांबळे , माजी नगरसेवक एम डी कांबळे, ओमकार पोतदार ,धीरज कांबळे आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.