ताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू ; राज ठाकरेंची सभा रद्द होणार ?

औरंगाबाद प्रतिनिधी :

औरंगाबादसह सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची येत्या 1 मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. मनसेच्या या सभेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. 26 एप्रिल ते 9 मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे या कालावधीत औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

या आदेशामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी असणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे.मनसेप्रमुख राज ठाकरे यांची होणारी सभा पोलिसांच्या आदेशामुळे रद्द करावी लागणार आहे.

त्यामुळे आता यावर मनसे नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागेल आहे. शहरातील पोलिस यंत्रणाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या सभेला परवानगी नाकारली होती. तरीही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेने सभेची तयारी सुरु केली होती.

रविवारी मनसेकडून सभेच्या ठिकाणी पूजन करून व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली होती. मात्र, आता जमावबंदीच्या आदेशामुळे सभेसाठी जोमाने कामाला लागलेल्या मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.तर एक बाजूला मनसेनं या सेभेचा एक टीझरही प्रकाशित केला आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला एक लाखांची गर्दी होईल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. असा आदेश लागू झाला असला तरी, मनसेकडून औरंगाबादमध्ये सभा होणारच, असा पवित्रा घेण्यात आला आहे.

पोलिसांनी सभेसाठी सुचविलेला पर्यायी जागेचा प्रस्तावही मनसेने नाकारला होता. मात्र, आता जमावबंदीचा आदेश झुगारून मनसे औरंगाबादमध्ये सभा आयोजित करणार का, हे पाहावे लागणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणारच. चिल्लर संघटनांना कितीही विरोध करू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आपले मत व्यक्त केले. राज ठाकरे यांच्या सभेला एक लाखाहून अधिक लोक येतील, असा दावादेखील त्यांनी केला आहे. आता पोलिसांच्या या निर्णयानंतर मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks