अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेतील त्रुटी तातडीने दूर करा : केडीसीसी बँकेच्या संचालकांचे नरेंद्र पाटील यांना निवेदन ; व्याज परतावा सुलभ पद्धतीने व तातडीने मिळण्याची केली मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतीना रोजगार उभा करण्यासाठी कार्यरत आहे. या महामंडळाच्या कामकाजातील त्रुटी तातडीने दूर करा, अशी मागणी केडीसीसी बँकेच्या संचालकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन महामंडळाचे अध्यक्ष आमदार श्री. नरेंद्र पाटील यांना पाठविले आहे. तसेच; महामंडळाच्या कोल्हापुरातील जिल्हा समन्वयक कार्यालयालाही हे निवेदन दिले आहे. निवेदनावर बँकेच्या ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संतोष पाटील, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, सौ. स्मिता गवळी, सौ. श्रुतिका काटकर यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे, या योजनेमध्ये व्याज कर्जदाराने अपलोड केल्याशिवाय व्याज परतावा मिळत नाही. बहुतांशी तरुणांना हे माहीतीच नसल्यामुळे त्यांचा व्याज परतावा लवकर जमा होत नाही, अशी आमची धारणा आहे. त्यामुळे योजनेविषयी संभ्रमावस्था आहे. मेळावे व इतर जनजागृतीच्या माध्यमातून हा विषय समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. किंवा थेट ही परवानगी बँकेला द्यावी, जेणेकरून मराठा समाजातील जास्तीत -जास्त बेरोजगारांना याचा लाभ होईल.
अगदी सुरुवातीला लेटर ऑफ इंटेड, उद्योग आधार इत्यादी प्राथमिक कागदपत्रे ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कर्ज मिळण्यास विलंब होत आहे. उद्योग व व्यवसायासाठी कर्ज मिळाल्यानंतर बँकेकडून व्याज दाखला घेऊन व्याज परतावा मागणी प्रस्ताव पोर्टलवर अपलोड केला जातो. वारंवार संबंधित कर्जदारास त्रुटी कळवून त्यांचा व्याज परतावा मागणी प्रस्ताव प्रलंबित ठेवला जातो. त्यामुळे मिळणारा व्याज परताव्याचा लाभ व भरावी लागणारी रक्कम गृहीत धरली जात असल्यामुळे व्याज परतावा न मिळाल्यामुळे कर्ज परतफेडीमध्ये अडचणी उद्भवतात.
व्याज परताव्यातील अडचणी, माहिती भरल्यानंतर येणाऱ्या त्रुटी या त्रासामुळे मराठा समाजाचे युवक -युवतींनी योजनेकडे पाठ फिरवली आहे.कर्ज मागणी व व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पोर्टल सुलभ व जलद करा, अशी मागणीही निवेदनात केली आहे.