ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : जिममध्ये आरोग्यास हानिकारक असलेल्या इंजेक्शनची जिममध्ये विक्रीप्रकरणी दोघांना अटक

कळंबा (ता. करवीर) येथील एस प्रोटिन्स व सुर्वेनगर येथील एस फिटनेस या जिममध्ये आरोग्यास हानिकारक असलेल्या मेफेनटरेमाईन सल्फेट या इंजेक्शनची विक्री व वापर होत असल्याने पोलिसांनी येथे छापा टाकून इंजेक्शनच्या 64 बाटल्या व इतर साहित्य असा 39 हजार 992 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी जिमचा चालक प्रशांत महादेव मोरे (वय 34, रा. मोरेवाडी) व ओंकार अरुण भोई (24, रा. सुप्रभात कॉलनी, आपटेनगर) या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

शहरात आणि जिल्ह्यामध्ये सुरू असणार्‍या जिममधून आरोग्यास हानिकारक असणार्‍या मेफेनटरेमाईन सल्फेट या इंजेक्शनचा डोस देण्यात येतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक वाघ व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी कळंबा मेन रोडवरील एस प्रोटिन्स व सुर्वेनगर येथील एस फिटनेस सेंटरवर छापा टाकला. या दोन्ही ठिकाणी प्रतिबंधित असणारी ही दोन्ही इंजेक्शन मिळून आली.

या इंजेक्शनचा घातक परिणाम शरीरावर होतो. अवयव निकामी होतात. त्यामुळे मेफेनटरेमाईन सल्फेट यासारखी इंजेक्शन विक्री करण्यास शासनाने प्रतिबंध केला आहे. जिममध्ये तरुणांना सुद़ृढ शरीरयष्टी करण्याचे आमिष दाखवून ही इंजेक्शन दिली जातात. अलीकडे या इंजेक्शनचा सर्रास वापर केला जात असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, विलास किरूळकर, संजय पडवळ, दीपक घोरपडे, संजय कुंभार, अमोल कोळेकर, प्रशांत कांबळे, संतोष पाटील, राजू कांबळे, विनोद कांबळे यांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks