आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये एक दिवसीय टीईटी मार्गदर्शन कार्यशाळा ऑनलाइन पद्धतीने संपन्न

गारगोटी प्रतिनिधी :
महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) शिक्षणशास्त्रातील पदवी पदविका प्राप्त उमेदवारासाठी यंदा दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी होत आहे.परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठीच्या उद्देशाने श्री मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी दीडशेहून अधिक उमेदवारांनी आपले नाव नोंदणीकृत केले होते. परीक्षेत येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे, तसेच परीक्षेच्या निकालांमध्ये वाढ होण्यासाठी व्यापकता लक्षात घेऊन, या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर चे सहयोगी प्राध्यापक डॉ. के. जे शिंदे ,कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूरचे प्रा. डॉ. एस. के. सूर्यवंशी व कन्टोनमेंट बोर्ड मराठी हायस्कूल कॅम्प, बेळगावचे सहाय्यक शिक्षक श्री महेश कुंभार या तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. सोमनाथ सूर्यवंशी व महेश कुंभार हे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सदस्य आहेत.
कार्यशाळेची सुरुवात उद्घाटन व महाविद्यालयाच्या प्रार्थना गीताने झाली. कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे सर्वांचे स्वागत कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. डॉ. एम. एन. मोरे. मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाची रूपरेषा महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आर. के. शेळके यांनी केली.
प्रथम सत्रामध्ये डॉ. के.जी. शिंदे यांनी पीपीटी चा वापर करून शिक्षक पात्रता परीक्षेत पेपर एक मधील महत्त्वाचा घटक बाल मानसशास्त्र हा विषय वेगवेगळ्या बाजूने समजावून सांगितला. या विषयाचे अध्ययन कसे करावे, कोणत्या पद्धतीचा वापर केल्याने बाल मानसशास्त्र आपल्याला सहज लक्षात राहील. बाल मानसशास्त्र मधील उपपत्या, मानसशास्त्र व्याख्या, स्वरूप, संकल्पना, मानसशास्त्रीय प्रयोग त्याचे उदगाते, मानसिक संकल्पना त्यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण करून सविस्तर सुस्पष्ट केले. व त्याचबरोबर परीक्षेला सामोरे जात असताना प्रश्नाचे स्वरूप वेळेचे नियोजन व अध्ययन कसे करावे याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात श्री महेश कुंभार यांनी अनिवार्य मराठी विषयाचे मार्गदर्शन केले. मराठी विषयात सर्वात जास्त भर हा मराठी व्याकरणावर दिलेला असतो. आपण व्याकरणामध्ये कोणत्या घटकावर किती लक्ष केंद्रित करायचे, व्याकरण कोणत्या पद्धतीने समजावून घ्यावयाचे तसेच मराठी साहित्यातील लेखक व त्या लेखकांची टोपण नावे कोणत्या प्रकारे लक्षात ठेवावीत, तसेच यावर प्रश्न कसे विचारले जातात. याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात मार्गदर्शक डॉ. एस. के. सूर्यवंशी यांनी टीईटीसाठी अनिवार्य इंग्रजी विषयातील संकल्पना यावर अधिक भर देऊन मार्गदर्शन केले. इंग्रजीमध्ये Vocabulary & compression , grammar , english pedagogy जास्त भर असतो. त्याच्या संकल्पना तसेच टीईटी परीक्षेतील गुणदान तक्ते यावर त्यांनी भर दिला. इंग्रजी व्याकरण व अध्यापनशास्त्राला प्रत्येकी किती गुण विभागणी असते, प्रश्नसंच कशाप्रकारचे असतात. व्याकरणाच्या स्वरूपाची विस्तृत माहिती, सामान्य माहिती परीक्षेमध्ये समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द या घटकांचे अध्ययन कसे करावे. परिसर अभ्यास व कवितेतील परिच्छेद याकडे कशाप्रकारे लक्ष द्यावे याची विस्तृत मांडणी डॉ. एस. के. सूर्यवंशी यांनी पीपीटी सादरीकरणातून सखोल मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यशाळेमध्ये २१ नोव्हेंबर २०२१ रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सामोरे कसे जावे, उमेदवारांचे प्रश्न व समस्या यांचे निराकरण केले. यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रेरणा ही महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांची मिळाली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. एम. एन. मोरे मॅडम यांनी केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक, उद्देश व रूपरेखा महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आर. के. शेळके यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ पी.बी. दराडे यांनी आभार मानून केले. या एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेसाठी आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद,आजी -माजी प्रशिक्षणार्थी व महाराष्ट्रातून उपस्थित असणारे परीक्षार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.परीक्षार्थीना याचा पुनरआढावा घेता यावा म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून त्याची लिंक परीक्षार्थीना दिली आहे.परीक्षार्थीनी सदर कार्यशाळा उपयुक्त असून त्याचा लाभ होणाऱ्या परीक्षेत नक्की होईल याबद्दल विश्वास मनोगतातून व्यक्त केला आहे. तसेच संस्था, महाविदयालय व प्राध्यापकवृंदा विषयी या उपक्रमातबद्दल ऋण व्यक्त करून आभार मानले आहे.