अपंगत्वावर मात करत अपंगच बनले घरचा आधार; बुजवडे येथील सख्या भावांची यशोगाथा

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
समाजात अशा काही अपंग व्यक्ती असतात त्या हातापायाने शरीराने काहीही ओजड – बोजड कष्ट शकत नाही. अशा व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींच्या आधाराची गरज असते.अपंग असणारे सख्खे भाऊ जर आपल्याच घरादाराचे आधार बनले तर किती नवल आहे नाही. अपंग असूनही आपल्या कलेने आणि बुद्धीचातुर्याने सुबक फर्निचर तयार करून मिळेल त्या पैशात अख्या कुटुंबाची जबाबदारी या दोन बंधूनी लिलया पेलली आहे.ते दोन बंधू म्हणजे बुजवडे (ता. राधानगरी )येथील सागर सुतार व संदीप सुतार हे होत.
बुजवडे (ता. राधानगरी) येथील केरबा सुतार हे शेती सांभाळत लोहार व्यवसाय सांभाळतात .त्यांना सागर व संदीप असे दोन मुलगे आहेत.ते आपसूकच लहानपणापासून अपंग आहेत.लहानपासूनच वडील आणि चुलते यांचे कलाकुसरीचे काम पहात त्यांनी फर्निचरची कलाकुसर, नक्षी व रेखीव काम वयाच्या पंधराव्या वर्षांपासूनच आत्मसात केले आहे.आज त्यांच्याकडे फर्निचर व्यवसायातील एवढे ज्ञान आहे की, त्यांची ती कला पाहता दुसऱ्याचे मन भारावून जाते.व सहानभूती वाटू लागते.अगदी गरिबीतून व हालाखीच्या झळा सोसत सागर आणि संदीप या दोन मुलांना वाढवलं आहे.परिणामी आई-वडिलांनी त्यांची सर्व काही हौसमौज पुरवली. सागर हा एका पायाने अपंग असून मुकबधीर आहे.तर दुसरा लहान भाऊ संदिप ही मुकबधीर आहे.हे दोघे भाऊ मिळवते असून दोंघाचीही लग्नगाठ अजूनही बांधली गेलेली नाही.
या आपल्या उत्कृष्ट फर्निचर व्यवसायात ते वेगवेगळे घरगुती साहित्य तयार करतात. त्यामध्ये डायनींग टेबल,सोपा सेट,घराचे दरवाजे,प्लायवूड शोकेस,खुर्च्या,लाकडी बाकडे,देवघरात लागणारी मंदिरे आदी साहित्य मशिनच्या आणि हात कलाकुसरीने ऑर्डरप्रमाणे अथवा मजुरीप्रमाणे बनवून देतात.या व्यवसायात तयांचे सहकारी विनायक सुतार यांची लाखमोलाची मदत मिळते.
आपल्या अपंगत्वावर मात करत व कोणतेही शिक्षण न घेतलेले हे दोन बंधू लाखो रुपयांचा हिशेब व आकडेमोड करू शकतात.अशा या कलावंतांनी आपल्या कलाकुसरीने बुद्धीचातुर्याने बुजवडे गावचा आणि सुतार कुटुंबीयांचा नावलौकिक पंचक्रोशीत आणि तालुक्यात वाढवला आहे.निश्चितच अशा अपंग कलावंतापासून काहीतरी शिकण्यासारखे आणि बोध घेण्यासारखे आहे.