आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य; शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर नितेश राणे यांनी घेतली नमती भूमिका

मुंबई :
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी 12 भाजप आमदारांनी निलंबित केलं होतं. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहाबाहेर प्रतिविधानसभा भरवली. त्यात भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेचे अध्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर अनेकांनी भाषणे दिली. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
‘आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल’, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. प्रतिविधानसभेत बोलताना सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे. तर शिवसेनेने नितेश राणे यांच्याविरूद्ध दंड थोपटले आहेत.
नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक आक्रमक झाले होते. बुधवारी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर नितेश राणे यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. इथून पुढे बोलताना नितेश राणे यांनी तोंड सांभाळून बोलावं आणि आदित्य ठाकरे यांची जाहिर माफी मागावी, अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी केली होती.
दरम्यान, विधानसभेबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता, तो बऱ्याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो, असं नितेश राणे म्हणाले. शिवसेनेच्या या आंदोलनानंतर नितेश राणे यांनी नमती भूमिका घेतली आहे. याआधीही नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करताना आदित्य ठाकरे यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधला आहे.