तारेवाडीतील जलतरणपटू निर्भय भारतीने मुंबई येथे पहाटे समुद्रात मारला सूर; 06 तास 34 सेकंदामध्ये 22 किलोमीटर सागरी अंतर केले पार.

नेसरी प्रतिनिधी : अंकिता धनके
गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभेच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव तारेवाडी या गावातील संदीप रामचंद्र भारती. हे नोकरीनिमित्त मुंबईतील डोंबिवली जवळ ठाकूरली येथे राहत असतात.
त्यांचा अकरा वर्षीय मुलगा निर्भय हा डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकतो. निर्भयला लहानपणापासूनच पोहण्याची फार आवड होती. त्यामुळे त्याने डोंबिवलीतील यश जिमखाना येथे पोहोण्याचे प्रशिक्षण घेत असताना निर्भयने समुद्रातील इव्हेंट करायचा निर्धार केला व गुरुवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी पाच वाजता कारंजा जेटी ते गेटवे ऑफ इंडिया असे 22 किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या 06 तास 34 मिनिटांमध्ये पोहून पार केले.
यापुढील येत्या काळात इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचे लक्ष्य असल्याचे निर्भय भारती याने निकाल न्यूजचे नेसरी प्रतिनिधी अंकिता धनके यांच्याशी बोलताना सांगितले.
निर्भयाच्या या यशासाठी त्याचे वडील संदीप भारती, आई वृषाली भारती, कोच विलास माने, रवी नवले, संतोष पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निर्भयाच्या या कामगिरीबद्दल गडहिंग्लज तालुक्यात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.