पन्हाळा : ओढ्याला खेकडे पकडायला गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमुळे मृत्यू

ओढ्याला खेकडे पकडायला गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शिकऱ्यांनी शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमुळे मृत्यू झाला होता. चोरट्या शिकारीचे बिंग फुटू नये, म्हणून पाच संशयितांनी मृत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह पावनगडावरून खाली जंगलात फेकून दिले होते. पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत अखेर दोघां भावांचे मृतदेह आज (दि. १३) सापडले. ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी तलावाच्या जवळच विजेचा शॉक देऊन चोरटया शिकारी केल्या जातात. त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह सापडले असून जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०) अशी मृत दोघा भावांची नावे आहेत. नातेवाईकांनी व गावकरी मागील ४ दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते.