तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या बस्तवडे गावच्या युवकाचा मृतदेह सापडला

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील बस्तवडे येथील आदित्य पांडुरंग पाटील (वय 23) या तरुणाचा मृतदेह काल (दि.११) दुपारी साडेतीन वाजता सापडला. सहलीवर गेले असता आदित्य शुक्रवारी दुपारी चार वाजता मालवण- तारकर्ली समुद्रात बुडाला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मुरगुड येथील एका खासगी संगणक प्रशिक्षण इन्स्टिट्यूटची 20 मुलामुलींची सहल कुणकेश्वर, देवगड, मालवण येथे गेली होती. दरम्यान तारकर्ली येथील पर्यटन महामंडळाच्या केंद्राजवळ आंघोळीसाठी समुद्रात उतरलेले चार विद्यार्थी अचानक आलेल्या लाटेने बुडू लागले. तेव्हा त्यांनी आरडा ओरडा केला. त्यावेळी स्थानिकांनी धाव घेऊन यातील तिघांना वाचवले मात्र आदित्यला वाचवता आले नाही.
यातील अजिंक्य पाटील, प्रसाद चौगुले व रितेश वायदंडे यांची प्रकृती व्यवस्थित असून आदित्यचा शोध मात्र सुरू होता. लाटेसोबत तो पाण्यात ओढला गेला होता. शुक्रवारी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम बंद करण्यात आली होती. शनिवारी सकाळी पुन्हा ही मोहीम सुरू केली होती. दरम्यान, आदित्यचे नातेवाईक देखील तेथे दाखल झाले होते. दुपारी साडेतीन वाजता ओहोटीनंतर त्याचा मृतदेह किनाऱ्यावर आढळला. रात्री 11 पर्यत शवविच्छेदन सुरू होते.त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार होता.
दरम्यान, या दु्र्दैवी घटनेने ऐन दिवाळीत बस्तवडे गावावर शोककळा पसरली आहे. आदित्य हा एक चांगला खेळाडू व व्यायामावर विशेष प्रेम करणारा मनमिळावू तरुण होता. आई- वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई- वडील, बहीण असा परिवार आहे.