माणुसकीचे दर्शन ‘या’ चोराकडून शिका’; कोरोना लस आणि इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला

मुंबई :
हरियाणाच्या जींद येथील शासकीय रुग्णालयात आगळ्या – वेगळ्या चोरीची घटना घडली आहे . बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कोरोना लशीच्या जवळपास शंभर डोसची चोरी केली होती. मात्र गुरुवारी या चोराने येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर चोरलेली सर्व औषधे एका चहा विक्रेत्याकडे दिली आणि ते सर्व डोस पोलिसांना देण्यास सांगितले. या चोराने चक्क चिठ्ठी लिहित सॉरी देखील म्हटले. या घटनेचा संदर्भ देत माणुसकी हरवलेल्यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोलाचा सल्ला दिला.
जंयत पाटील यांनी या चोरट्याची चिठ्ठी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. तसेच, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत जीवनरक्षक ठरणाऱ्या औषधांचा काळाबाजार करत आहेत . त्यांनी हरियाणातील या चोराकडून धडा शिकायला हवा, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान सॉरी, मला माहीत नव्हते यात कोरोनाचे औषध आहे, असे चोराने या चिठ्ठीत लिहिले होते . या चोरट्याने लिहिलेली ही चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.