महाराष्ट्रातील सर्वात मोठं लाचखोरीचं प्रकरण नगरमध्ये उघडकीस ; तब्बल एक कोटींची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक

ठेकेदाराला पाईपलाईनचे मोठं काम दिलं म्हणून त्याचं फळ म्हणून किती लाच मागावी ? तर तब्बल एक कोटी रुपयांची ! महाराष्ट्रातील हे सर्वात लाचखोरीचे प्रकरण नगर जिल्ह्यात उघडकीस आले असून नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. याप्रकरणी एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर मध्ये ही कारवाई केली यामध्ये अमित किशोर गायकवाड (वय ३२ रा. नागापूर, नगर, मूळ रा. चिंचोली, ता. राहुरी) या सहाय्यक अभियंत्याला अटक करण्यात आले असून त्याचा वरिष्ठ व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छत्रपती संभाजी नगर येथील ठेकेदार अरुण गुलाबराव मापारी यांचे मापारी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या नावाने कंपनी आहे. या कंपनीने नगरच्या एमआयडीसीमध्ये 1000 मिलिमीटर व्यासाच्या लोखंडी पाईपलाईनचे काम केले होते. त्याचे दोन कोटी 66 लाख 99 हजार रुपयांची बिल येणे बाकी होते. हे बिल मिळवण्यासाठी मागील तारखेचे बिल तयार करून त्यावर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्या सह्या घेऊन ते बिल मंजूर करून देतो म्हणून गायकवाड याने त्याच्यासाठी आणि वाघ याच्यासाठी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती.
दरम्यान एवढी मोठी लाच मागितल्याने मापारी यांना देखील धक्का बसला. त्यांनी नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर अमित गायकवाड याने लाच मागितल्याचे या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यावरून नाशिकच्या पथकाने तीन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सापळा रचला.
दरम्यान ही लाच स्वीकारण्यासाठी शेंडी बायपास जवळ गायकवाड याने मापारी यांना बोलावले. दरम्यान लाच लचपत प्रतिबंधक विभागाने एक कोटी रुपयांची लाच तयार करताना, यामध्ये पन्नास हजार रुपयांच्या खऱ्या नोटा तर इतर नोटा या खेळण्यातल्या असा एक कोटी रुपयांची बंडले तयार केली होती.
आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लाचखोरीची माहिती दिली आणि राज्यात खळबळ उडाली.