ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक : यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार, मदुराई रेल्वेस्थानकातील घटना

मदुराई (तामिळनाडू) येथील रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या खासगी डब्यात शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत १० प्रवासी मृत्युमुखी पडले. डब्यातून अवैधरीत्या आणल्या गेलेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेला डबा ‘प्रायव्हेट पार्टी कोच’ होता. तीर्थयात्रेसाठी हा डबा बुक करण्यात आला होता.

दक्षिण रेल्वेने सांगितले की, रेल्वे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य राबवून १० मृतदेह बाहेर काढले. सहा मृतकांची ओळख पटविण्यात आली आहे. नागरकॉईल येथून हा डबा एका एक्स्प्रेसला जोडून मदुराईपर्यंत आणण्यात आला होता. तेथून तो लखनौला जाणाऱ्या गाडीला जाेडण्यात येणार होता़ तोपर्यंत डबा वेगळा करून उभा करण्यात आला होता. तो डबा एखाद्या गाडीला जोडलेला असता तर आणखी भीषण दुर्घटना घडली असती.

परतीच्या वाटेतच काळाने गाठले…..
डब्यात ६५ प्रवासी होते. ते उत्तर प्रदेशातील लखनौहून मदुराईला जात होते. या प्रवाशांनी १७ ऑगस्ट रोजी लखनौहून प्रवास सुरू केला होता. २७ ऑगस्ट रोजी ते चेन्नईला जाणार होते. तेथून ते लखनौला परतणार होते.

१५ लाख रुपयांची भरपाई मिळणार
मृतांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. त्यातील १० लाख रुपये रेल्वे देईल. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे ३ लाख रुपये आणि उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री २ लाख रुपये देतील.

सहा मृतांची ओळख पटली असून, ते लखनौ, सीतापूर आणि लखीमपूर येथील रहिवासी आहेत. शत्रुदमन सिंह (सीतापूर), मिथिलेश कुमारी (सीतापूर), शांती देवी (लखीमपूर), मनोरमा अग्रवाल (लखनौ), हिमानी बन्सल (लखनौ) आणि परमेश्वर दयाल अशी मृतांची नावे आहेत.

अशी लागली आग….

डबा रेल्वे स्थानकावर उभा होता, तेव्हा काही प्रवाशांनी चहा-नाश्त्यासाठी डब्यातून बेकायदा आणलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा वापर केला. त्यावेळी सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकली.

आम्ही झोपेत होतो, तेव्हा आरडाओरडा ऐकू आला. आम्ही उठून पळू लागलो. पण, दरवाजा बंद होता. कोणी तरी कुलूप तोडले आणि आम्ही बाहेर पडलो. डब्यात एवढा धूर झाला होता की, श्वास घेता येत नव्हता.
– अलका प्रजापती, प्रवासी

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks