सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आनंद मळाळे असे आहे. आनंद मळाळे हे नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस सेवा करत होते. त्यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने कामाचा ताण असल्यामुळे आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मागील महिन्यामध्ये त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे कामावरुन रजा घेत ते सोलापूरमधील घरी राहण्यासाठी आले होते. याच घराच्या अंगणामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
आज (दि.07) पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आनंद मळाळे हे घराच्या अंगणामध्ये आले. यावेळी त्यांची पत्नी घरामध्येच होती. अंगणामध्ये येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली आणि स्वतःचे आयुष्य संपवले. गोळीचा आवाज ऐकताच त्यांची पत्नी अंगणामध्ये आली तेव्हा त्यांनी आनंद मळाळे यांना रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले पाहिले. या धक्कादायक घटनेची माहिती कळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे , सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.
आत्महत्या करणारे आनंद मळाळे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील असून सोलापूर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर पोलिस आयुक्तालयात विविध ठिकाणी कर्तव्य बजाविले होते. त्यानंतर पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. मृत आनंद मळाळे यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.