ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू कारखान्याला बक्षिस मिळाले म्हणून कागल शहरातील काजळी आणि काळे पाणी बंद झाले नाही ; माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांचा पलटवार

कोल्हापूर, प्रतिनिधी:

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला बक्षीस मिळाले म्हणून कागल शहरात पडणारी काजळी आणि विषारी केमिकलचे काळे पाणी बंद झालेले नाही, असा पलटवार माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी केलेला आहे. कागल शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, असा इशाराही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात श्री. गाडेकर यांनी म्हटले आहे, शाहू साखर कारखान्याची स्थापना स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आमदार हसनसाहेब मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीही केली आहे. त्या भावनेतूनच आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी अनेक निवडणुका बिनविरोध केल्या आहेत.

मात्र, या कारखाना उभारणीमध्ये समरजीत घाटगे यांचा कोणताही सहभाग नाही. कारण, ते जन्मायच्या आधीच या साखर कारखान्याची साखर पडली होती. आयत्या पिठावरच ते रांगोळ्या ओढत सुटले आहेत. स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आमदार श्री. मुश्रीफसाहेब व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी त्यावेळीपासूनच कारखान्याला हे वळण लावले आहे. हे दोन्ही नेते संचालक असतानाच्या काळातही कारखान्याला अनेक बक्षिसे मिळालेली आहेत. परंतु; कारखान्यातून बाहेर पडणारी काजळी आणि विषारी केमिकलयुक्त काळे पाणी या माध्यमातून कागल शहराच्या नागरिकांच्या जीवाशी जे खेळण्याचे काम सुरू आहे ते बंदच झालेच पाहिजे.

पत्रकात श्री. गाडेकर यांनी पुढे म्हटले आहे, आमचे नेते आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी महिन्याभरापूर्वीच यावर वक्तव्य केले होते. त्यावर समरजीत घाटगे यांनी अद्यापही चकार शब्दसुद्धा उच्चारलेला नाही. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या काजळीमुळे कागल शहराच्या नागरिकांच्या आरोग्याचा फार मोठा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तसेच, आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी कागलच्या जनतेला स्वच्छ, मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून काळमवाडी धरणातून ६५ किलोमीटर कालव्यातून पाणी आणून कागलच्या जयसिंगराव तलावात सोडले आहे.

त्यात जर कारखान्यातून बाहेर पडणारे केमिकलयुक्त मळीचे विषारी काळे पाणी मिसळले तर जनतेच्या आरोग्याचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणूनच बक्षीस मिळाले म्हणजे हे सगळं बंद झालं असा अर्थ होत नाही. त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. अशी बक्षिसे परवाच बिद्री साखर कारखाना, दत्त कारखाना यानाही मिळालेली आहेत, ती मिळतच राहतील.

” जनतेचा उद्रेक महागात पडेल…….”
श्री. गाडेकर यांनी पत्रकात म्हटले आहे, समरजीत घाडगे, आरोग्याचा गंभीर प्रश्न बनलेल्या काजळी आणि केमिकलयुक्त विषारी पाणी बंद होण्यासाठी तुमची इच्छा असेल तर आमचे नेते आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी तुम्हाला भेटण्याचीही इच्छा व्यक्त केलेली होती. त्यातूनही प्रश्न संपला नाही तर काजळी आणि विषारी पाण्यामुळे जनतेचा जो उद्रेक होईल तो तुम्हाला महागात पडेल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks