विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या बुलबुल पक्षास जीवदान .

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
विद्युत तारेचा धक्का लागल्याने एक बुलबुल पक्षी वरून जोरात खाली कोसळ आणि तडफडू लागला . हे दृश्य सुशांत कानकेकर व ऋषिकेश साळुंखे या मित्रांनी पाहिले . ताबडतोब त्यांनी त्या पक्षाला उचलून घेतले आणि क्षणाचा विलंब न लावता त्याला घेऊन वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या घरी गेले . श्री सूर्यवंशी हे पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवणारे मुरगूड परिसरातील एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत . त्यांनी सदर पक्ष्यास काही प्रथमोपचार करू एका बंद पिंजऱ्यामध्ये दोन दिवस त्याचा सुरक्षितपणे सांभाळ केला . या दरम्यान त्यास खाद्य व औषध उपचार करून त्यास तरतरीत बरे केले आणि दोन दिवसानंतर सदर पक्षास निसर्गाच्या अधिवासात त्यांनी मुक्त केले . अत्यंत आनंदाने या पक्षाने सुर्यवंशी यांच्या हातावरून आकाशात भरारी घेतली .
एका निष्पाप जीवाला या तीन पक्षीमित्रांनी जीवदान मिळवून दिले होते . साळुंखे, कानकेकर आणि वृक्षमित्र सूर्यवंशी यांनी केलेले हे छोटेसे कार्य त्यांच्या अंतकरणाला समाधान देऊन गेल असणार यात शंकाच नाही . भारतीय संस्कृतीतील भूतदया या शब्दप्रयोगाचा त्यांनी कृतीत अंमल केला होता हे निश्चित .