क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
धावपटू रोहनला हवी आहे समाजाच्या दातृत्वाची ‘ धाव’; बिद्रीच्या रोहन कांबळे या खेळाडूची केनियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; दानशूरांकडून आर्थिक मदतीची गरज

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
घरची कौटूंबिक परिस्थिती बेताची, स्वतःसह कुटूंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या आई – वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘ तो ‘ धावू लागला. कधी उपाशी तर कधी अर्धपोटी आणि प्रसंगी अनवाणी धावणाऱ्या या खेळाडूने शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या.केनिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आता त्याची निवड झाली असून हा खर्च त्याला पेलवणारा नाही.बिद्री ( ता. कागल ) येथील रोहन गौतम कांबळे या उदयोन्मुख खेळाडूला या स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असून समाजातील दानशूरांनी त्याला पाठबळ देण्याची गरज आहे.
बिद्री गावचे रहिवासी असलेले गौतम कांबळे हे अल्पभूधारक शेतकरी. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. त्यात उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसताना, खाणारी तोंडे मात्र आठ ! अशा प्रतिकुल कुटूंबातील रोहन आठवीत असताना खेळाकडे वळला. सुरवातीला लांब उडी, तिहेरी उडीत त्याने राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत धडक मारली. मार्गदर्शक रामदास फराकटे यांनी त्याच्यातील क्षमता ओळखून त्याला हर्डल्स ( अडथळ्याची शर्यत ) या क्रीडा प्रकाराकडे वळवले.
या खेळासाठी लागणारी आवश्यक साधने आणि अपुरे मैदान या अडथळ्यांवर त्याने मात केली. रोहनने अवघ्या दोन वर्षात तीव्र इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर हर्डल्समध्ये जोरदार मुसंडी मारत राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या १९ व्या ज्युनिअर फेडरेशन कप अॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने २० वर्षाखालील मुलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक मिळवले. आता त्याची नैरोबी ( केनिया ) येथे होणाऱ्या २० व्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आजअखेर एकही खेळाडू पात्र ठरलेला नसून रोहन हा जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. रोहन हा बिद्रीच्याच दूधसाखर महाविद्यालयात बी.ए. भाग एकच्या वर्गात शिकत आहे. सध्या तो शिवाजी विद्यापिठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर अभिजित मस्कर यांच्या तर महाविद्यालयाच्या मैदानावर रामदास फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
केनियात १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून यासाठी त्याला पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च येणार आहे. रोहनच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याच्या कुटूंबियांना हा खर्च परवडणारा नाही.याशिवाय भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि त्याच्या पौष्टीक खुराकासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज असून समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी त्याच्या मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या रोहनच्या कारकिर्दीतील हा अडथळा, अशा दानशूरांनी दूर करावा अशी अपेक्षा त्याच्या कुटूंबिय व मित्रपरिवाराने व्यक्त केली आहे.
रोहनला मदत करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर किंवा खालील गुगल पे, फोन पे, पेटीएम क्रमांकावर दानशूर व्यक्तींनी मदत पाठवावी ही विनंती.
नांव : रोहन गौतम कांबळे
खाते क्रमांक : 60 25 7110 242 (बँक ऑफ महाराष्ट्र)
आय. एफ. एस. सी. कोड (IFSC Code) : MAHB0000504
फोन पे, गुगल पे, पेटीएम क्रमांक : 97 63 65 31 00