आंबेओहोळ परिसरात शेतक-यांच्या त्यागामुळे हरितक्रांती : राजे समरजितसिंह घाटगे ; शंभर टक्के भरलेल्या आंबेओहोळ प्रकल्पातील जलपूजन सोहळा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
उत्तूर परिसराला वरदान ठरणारा आंबेओहोळ प्रकल्प 100% भरला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न सत्यात साकारत आहे. या धरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून रेंगाळलेले काम पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभले. या परिसरातील हरितक्रांतीचे सर्व श्रेय या परिसरातील शेतकऱ्यांच्या त्यागालाच आहे.असे भावपूर्ण उद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी काढले.
आंबेओहोळ प्रकल्प 100% भरल्यानंतर या पाण्याच्या पूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पातील पाणी पूजन श्री घाटगे यांच्या हस्ते या परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थान मध्ये जलक्रांती केली. त्यांचाच वारसा कृतीतून चालविलेल्या स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या अमृत महोत्सवी जयंतीच्या पार्श्वभूमीवर जलपूजनाचा मान या शेतकऱ्यांनी मला दिला. त्यांचे हे ऋण मी विसरू शकत नाही. मात्र या निमित्ताने स्व. राजे साहेब यांना अपेक्षित असलेला शाश्वत विकास या परिसरात साकारत आहे.या पाण्याचा लाभ राजकारण विरहितपणे सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पुनर्वसनाचे शिल्लक असलेले प्रश्न मार्गी लावणार आहोत.
भाजपचे गडहिंग्लजचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे म्हणाले स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प तब्बल वीस वर्षे रेंगाळला होता.राजे समरजितसिंह घाटगे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे भाजप शासनाच्या माध्यमातून 227 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे या प्रकल्पाचे काम मार्गी लागले. गतवर्षी सर्वत्र पाणीटंचाई भासत असताना या प्रकल्पामुळे आजरा गडहिंग्लज परिसरात शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. संबंध नसणारी मंडळी श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना राजे साहेब यांनी प्रत्यक्ष कामातून उत्तर दिले आहे.
यावेळी अतिशकुमार देसाई सरपंच अनुप पाटील रूपाली पाटील प्रदीप लोकरे संग्राम घाटगे भास्कर भाईंगडे प्रवीण लोकरे श्रीपती यादव मंदार हळवणकर धोंडीराम सावंत संदीप गुरव संदेश रायकर प्रशांत पोतदार धोंडीराम सावंत सुरेश कुरुणकर अमर पोटे अनिल पाटील अमृत पाटील वरूण गोसावी संग्राम घाटगे राजाराम इंगळे यांचे सह शेतकरी उपस्थित होते.स्वागत जनार्दन निऊंगरे यांनी केले आभार विठ्ठल उत्तूरकर यांनी मानले.
पाणी पुजनाचा हक्क राजेंचाच
तब्बल वीस वर्षे हा प्रकल्प रेंगाळला होता. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हरितक्रांतीपासून वंचित राहिले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जलनीतीचा वारसा चालवणाऱ्या त्यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारले आहे. त्यामुळे हे धरण भरल्यानंतर धरणातील पाणी पूजनाचा हक्क खऱ्या अर्थाने राजे समरजितसिंह घाटगे यांचाच आहे. असे प्रतिपादन जनार्दन निऊंगरे यांनी यावेळी केले. त्याला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.