मळगे बुद्रूक-भडगाव दरम्यान मोरी भराव वाहून गेल्याने अपघाताची शक्यता

मुरगुड प्रतिनिधी :
मळगे बुद्रुक भडगाव रस्त्यावरील मळगे बुद्रुक गावच्या पश्चिमेस मळगे ओढ्यावर असणाऱ्या मोरीच्या बाजूचा भरावा महापुराच्या पाण्यामुळे वाहून मोरीवरील प्रवास धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागाने मोरीच्या बाजूला भरावा टाकून दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. कुरणी ते म्हाकवे हा रस्ता महत्त्वाचा असून दीड वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाले आहे. या रस्त्यावर भडगाव ते मळगे बुद्रुक रस्त्यावर ओढ्यावर मोरी असून जुलै अखेरीस आलेला महापूर व ओढ्यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मोरीच्या उत्तर बाजूचा मुरमाचा भरावा व बाजूपट्टी देखील ओढ्यातून वाहून गेल्याने सिमेंटमध्ये असणारी मोरी उघडी पडली आहे. परिणामी चार फूट खोल एवढा बाजूपट्टीच्या नजीक खड्डा पडला आहे. बाजूपट्टी वाहून गेल्याने डांबरी रस्ता खचला जात आहे.