ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार

गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. तसेच या गटासह त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. तसेच शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले होते. आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणी तातडीची सुनावणी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला.
ठाकरे गटाकडून मे महिन्यात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ही याचिका फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती आणि न्यायालयाने मे महिन्यात आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला. आता शिवसेनेने आयोगाने दिलेल्या निर्णयाची तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली होती.
यावर निर्णय देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याअध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, यावर आम्ही दोन मिनिटात निर्णय देऊ शकत नाही.सध्या खंडपीठाकडे कलम 370 ची सुनावणी सुरू आहे, आधी ती पूर्ण होऊ देत मग आम्ही तुमची याचिका सुनावणीसाठी घेऊ.महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाची सुनावणी झाली तेव्हा या विषयाची आधीच चर्चा झाली आहे. उद्यापासून आम्हाला कलम 370 संदर्भात सुनावणी करायची आहे, त्यानंतर तुमची याचिका घेऊ, असे म्हणत न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला.