एक प्रयोगशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक – व्ही.एस हतगिणे

कळे -वार्ताहर अनिल सुतार
“आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे,
उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे”
ह्या पद्यांतील काव्यरचने प्रमाणे व्यक्तीमत्व असलेले,नेहमी दुसऱ्यांचा आदर करण्यात आनंद मानून जनसामान्यांत वावरणारे आणि एकतीस वर्षे स्वतःला शिक्षण प्रवाहात वाहून घेणारे निवृत्त शिक्षक म्हणजे डी.सी नरके कॉलेज कुडित्रेचे प्रा. हतगिणे सर.
काही लोक जन्माला येतात काहीतरी शिकुन आयुष्यभर नोकरी करतात आणि सेवा निवृत्त होतात.. मात्र काही याला अपवाद ठरतात… आपल्या कामावर आयुष्यभर निष्ठा ठेवत निष्काम ‘सेवा ‘हेच त्यांचे व्रत … त्यामुळे काम त्यांच्या साठी काम न राहता त्यांच्या साठी ते जीवन बनते.
“शब्दांची पुजा करत नाही मी माणसांसाठी आरती गातो.ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो”.
असे कवी यशवंत मनोहर यांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर एका दिव्याप्रमाणे नेहमी ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान मानण्यात ज्यांनी आपली उभी हयात घालवली, ज्ञानदानाच्या धड्यांना प्रयोगशीलतेची साथ देत प्रभावी अध्ययन व अध्यापन करण्यात माहीर असलेले बेळगाव ता. निप्पाणी येथील कोरडवाहू पण लॅण्डलॉर्ड कुटुंबात जन्मलेले अक्कोळ गावचे तत्कालीन तंबाखू कमिशन एजंट यांचे सुपुत्र व डी सी नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज कुडित्रे ता. करवीर येथील व्होकेशनल विभागाचे विभागप्रमुख . प्राध्यापक विजय सदाशिव हतगिणे तथा व्ही एस हतगिणे सर आज आपल्या शिक्षकी पेशातील ३१ वर्षाच्या दीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.कुडित्रे सारख्या ग्रामीण भागात राहत शिक्षण क्षेत्रात त्यांनी जी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद असून जीवन जगण्याचे ते एक आदर्श परिमाण मानले जाते.
प्रा.हतगिणे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षित बी ई . ईलेक्ट्रीकल ही पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या नोकरीची सुरुवात भरतेस पॉलिटेक्नीकल कॉलेज बेळगाव तसेच आय. सी. आर ई गारगोटी या डिप्लोमा इंजिनिअर कॉलेजमध्ये झाली.याच दरम्यान डी. सी .नरके ज्युनिअर कॉलेज ,कुडित्रे ता. करवीर या महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज मध्ये किमान कौशल्यावर आधारीत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु झाले . कर्नाटक ही आपली जन्मभूमी असली तरी सरांनी डी.सी नरके कॉलेजलाच आपली ‘कर्मभूमी ‘ मानून पूर्णवेळ शिक्षकाची नोकरी या कॉलेजमध्ये स्विकारली .
१९९२ पासून २०२३ पर्यंत त्यांनी या विभागाकडे लेक्चरर म्हणून अत्यंत प्रामाणिक पणे काम पाहिले . आपल्या विभागाचे काम पाहत असतानाच त्यांच्या अंगी अनेक पैलू दिसून आले ते म्हणजे त्यांचे इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व तसेच फिजिक्स व गणित विषयाची आवड असल्याने आपले काम सांभाळून या विषयांचे ज्ञान अवगत करून कला व विज्ञान या ज्ञान शाखातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले . आपल्या विभागातील ‘इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी ‘ या कोर्ससाठी तर त्यांनी स्वतःला झोकून देत काम पाहिले.थेअरी व प्रॅक्टीकल यांची सांगड घालून शिकविणे.थेअरी नुसार प्रॅक्टीकल जुळवलेच पाहिजे असे त्यांचे म्हणणे असे.
विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणेसाठी ते विशेष परिश्रम घेत असत विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थिती बरोबरच त्यांच्याकडे वैयक्तीक लक्ष देवून त्यांना जीवन जगण्याचा कानमंत्र ते देत.
कॉलेजच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखणे हीच त्यांची कामावरील निष्ठा होय .विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण झालेनंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे . गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी नोकरी शोधणे हे त्यांचे कार्य आजही नेटाने पुढे सुरु आहे .
सरांचे बरेचसे विद्यार्थी व्यवसायात आहेत . इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर , वायरिंग कॉन्ट्रॅक्टर , घरगुती उपकरणे दुरुस्ती करणारे , औद्योगिक वसाहती मध्ये नोकरी करणारे असे विविध क्षेत्रात काम करणारे व काही उच्च पदस्थ नोकरी करणारे विद्यार्थी आहेत. .
त्यांनी आपल्या विषयाचे अध्ययन अध्यापन सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत केले. अत्यंत मनमिळावू सहकारी, कार्यकुशल ,निगर्वी,वाचन व्यसंगी , प्रामाणिक , अभ्यासू, सेवानिष्ठ, विद्यार्थीप्रिय, चौकस , श्रध्दाळू, प्रभावी वक्ता,आज्ञाधारक व्यक्ती असे विविध पैलू असलेले हे व्यक्तिमत्त्व तितकेच कुटुंबवत्सल ही आहे . आई वडिलांच्या पश्चात एकत्र कुटुंब असताना त्यांनी आपल्या भावाचे उच्च शिक्षण पूर्ण केले आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करत या सुजलाम् सुफलाम् शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली आहे . याचे सर्व श्रेय ते या आपल्या नोकरीला देत आहेत. त्यांची मुले उच्च शिक्षित आहेत . मुलगा पुणे येथे सॉप्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे .
सोमवार दि ३१ जुलै २०२३ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत . कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,आजी-माजी विद्यार्थी यांच्या कडून त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांची हीच ओळख अधोरेखित करण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न.
शब्दांकन
#प्रा. पी. जे.पाटील # प्रा.पी.आर. पाटील #
डी.सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज कुडित्रे ता-करवीर जि -कोल्हापूर