स्व.विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी वीस जुलैला चित्रकला स्पर्धा ; सलग चोविसाव्या वर्षी स्पर्धेचे आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या २८ जुलै रोजी होणाऱ्या ७७ व्या जयंतीनिमित्त रविवार दि. २० जुलै रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
कागल, मुरगुड, सेनापती कापशी व कणेरी (ता. करवीर) अशा चार केंद्रावर एकाचवेळी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कागल तालुका व शाहू साखर कारखाना कार्यक्षेत्र मर्यादित या स्पर्धा होतील. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रणित श्री छत्रपती शाहू कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सलग चोविसाव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त तेवीस वर्षांपूर्वी या स्पर्धेची सुरुवात झाली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जयंतीनिमित या स्पर्धा घेण्यात येत आहेत.
पहिली ते तिसरी,चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर (पहिली ते चौथी) व मतिमंद अशा सहा विविध गटात स्पर्धा होतील.स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दोन या वेळेत सहावी ते सातवी, आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद या चार गटातील स्पर्धा होतील. तर दुसऱ्या सत्रात दुपारी दीड वाजता पहिली ते तिसरी व चौथी ते पाचवी या दोन गटातील स्पर्धा होतील. पहिली ते तिसरी या गटातील स्पर्धकांना रंगीत खडू किंवा स्केच पेन वापरता येईल. पुढील गटातील स्पर्धकांनी वॉटर कलर वापरण्याचे आहेत. मूकबधिर गटातील विद्यार्थ्यांना रंगीत खडू, स्केच पेन किंवा वॉटर कलर वापरता येणार आहेत. संयोजकांनी पुरविलेल्या कागदावर स्पर्धेवेळी दिलेल्या विषयावर स्पर्धकांनी चित्र काढणेचे आहे.
कागल येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल, मुरगुड येथे मुरगुड विद्यालय, सेनापती कापशी येथे न्यायमूर्ती रानडे विद्यालय तर कणेरी (ता. करवीर) येथे श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या चार केंद्रांवर या स्पर्धा होतील. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे आपल्या शाळेमार्फत मुख्याध्यापकांच्या सहीने शुक्रवार दिनांक १८ जुलैअखेर वरील केंद्रांवर नोंदविणेची आहेत.
तज्ञ व नामवंत परिक्षकांकडून स्पर्धेचे परिक्षण करुन निकाल जाहीर केला जातो. पहिल्या चार गटातील सर्वोत्कृष्ट तर केंद्र पातळीवरील सर्व गटातील विजेत्यांना रोख रकमेसह प्रशस्ती पत्र असे बक्षिस वितरण समारंभपूर्वक केले जाते. तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र संबधित शाळेमार्फत पोहोच केले जाते. इच्छुक स्पर्धकांनी नजीकच्या केंद्रावर मुदतीत नावे नोंदवून या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.